मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन महापुरुषांना अभिवादन करून क्रांतीची मशाल पेटविली आहे, जनतेच्या उत्स्फूर्त व प्रचंड प्रतिसादामुळे आणि प्रत्यक्ष सहभागामुळे भारत जोडो यात्रा यशस्वी झालीच; परंतु त्याचबरोबर या पदयात्रेने परिवर्तनाचे संकेत दिले आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.
महाराष्ट्रात पदयात्रेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या सर्वाचे प्रदेश काँग्रेसच्या वतीन आभार मानण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व जोडो यात्रेचे समन्वयक विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ नोव्हेंबरला पदयात्रेने नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून महाराष्ट्रात प्रवेश केला. देगलूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून राहुल गांधी यांनी क्रांतीची मशाल पेटवली. मंदिर, मशीद, बौद्ध विहार, गुरुद्वारामध्ये जाऊन त्यांनी भारताची खरी ओळख असलेल्या विविधतेतील एकतेचे दर्शन घडविले.
देगलूर येथून सुरू झालेला महाराष्ट्रातील पदयात्रेचा हा प्रवास बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे संपला. १४ दिवासांच्या या प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा दररोज हजारो लोक जमा होऊन राहुल गांधी व भारतयात्रींची आतुरतेने वाट पाहात असल्याचे चित्र दिसले. पहाटेच्या वेळी माता भगिनींनी यात्रा मार्गावर सडा टाकून रांगोळी काढून यात्रेचे स्वागत केले. लोकांनी उस्फूर्तपणे येऊन भारत जोडो यात्रेत आपले योगदान दिले. नांदेड व शेगाव येथील जनसभेने तर गर्दीचे उच्चांक मोडले, विशेषत: शेगाव येथे जमलेला लाखोंचा जनसमुदाय परिवर्तनाचे संकेत देऊन गेल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
‘अतिथी देवो भव’ची महाराष्ट्राला थोर परंपरा लाभलेली आहे. पंढरपूरच्या विठुरायाला भेटण्यासाठी दरवर्षी जशा पालख्या निघतात आणि यातील वारकऱ्यांचे स्वागत व आदरातिथ्य मराठी माणूस करतो, त्याच पवित्र भावनेचे दर्शन या पदयात्रेतही झाले, हीच महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा आहे. भारतयात्रींच्या पाहुणचारात आपण तसूभरही कमी पडू दिले नाही. भारत जोडो यात्रेच्या या महायज्ञात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे, त्याबद्दल काँग्रेसच्या वतीने सर्वाचे आभार मानण्यात आले आहेत.