मुंबई : गेल्या काही वर्षांपासून राज्यासह देशाला वातावरण बदलाचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. पेट्रोल – डिझेलवर धावणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी रेल्वे मंडळाने पुढाकार घेतला. रेल्वे मंडळाने डिसेंबर २०२१ रोजी इंधन बचतीसाठी, तसेच हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व रेल्वे अधिकाऱ्यांना शक्य तितक्या लवकर विद्युत (इलेक्ट्रिक) वाहनांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांचा वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वांनाच विसर पडला आहे.

गेली दोन वर्षे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसह बहुसंख्य रेल्वे अधिकाऱ्यांची वाहने आजही पेट्रोल-डिझेलवर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला मुहूर्त लागेना, सुमारे २४ हजार अर्जदारांना सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा

भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी हरित रेल्वे बनण्यासाठी कार्यरत असून २०३० पूर्वी ”निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक” बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी अनेक उपक्रम, उपाययोजना पर्यावरणपूरक कामे केली जात आहेत. तसेच भारतीय रेल्वेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन वापरासाठीची वाहने पेट्रोल-डिझेलऐवजी विजेवर धावणारी असावी, अशा सूचना रेल्वे मंडळाने दिल्या होत्या. ऊर्जा मंत्री, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री यांनी ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय रेल्वेला विद्युत वाहनांचा वापर करण्याबाबत पत्र पाठवले होते. तसेच परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या इंधनाचा वापर कमी करण्यासाठी विद्युत वाहनांचा वापर वाढणे आवश्यक आहे. परिणामी, पेट्रोल, डिझेलच्या वाहनांचे रुपांतर विद्युत वाहनांमध्ये करावे, विद्युत वाहनांची खरेदी करावी, तसेच ही वाहने भाडेतत्वावर घेण्यास सुरुवात करावी. त्यामुळे इतर रेल्वे कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना विद्युत वाहन खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही पत्रात म्हटले होते.

रेल्वे मंडळाने भारतीय रेल्वेमधील सर्व महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून विद्युत वाहने खरेदी किंवा भाड्याने घेण्याच्या सूचना केली होती. मात्र, दोन वर्षे होऊन गेली तरीही अद्याप मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव, मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांची कार्यालयीन वापरातील वाहने पेट्रोलवर धावत आहेत. तसेच इतर अधिकाऱ्यांची वाहनेही पेट्रोल, सीएनजी, हायब्रीड, डिझेलवर धावत आहेत. काही अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन वापरातील वाहनांचा विमा संपला आहे. तसेच जानेवारी २०२३ मध्ये वाहन नोंदणी केलेली पेट्रोलवर धावणारी वाहने घेण्यात आली आहेत. यावरून रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये विद्युत वाहने खरेदी करण्यास किंवा भाड्याने घेण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे २०३० पर्यंत विद्युत वाहनांची संख्या वाढविण्याचे उद्दीष्ट साध्य होण्याची शक्यता धूसर बनू लागली आहे.

हेही वाचा – संगोपनाची जबाबदारी दोन्ही पालकांची, अल्पवयीन मुलीला अमेरिकास्थित पतीकडे सोपवण्याचे आदेश देताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्युत वाहन वापरल्यास त्याचे अनुकरण कर्मचारी करतील. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होईल. त्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये विद्युत वाहनांचा तातडीने वापर करावा, अशा सूचना उर्जा मंत्री, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री यांनी दिल्या होत्या.

याबाबत अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. भविष्यात याबाबतचे नियोजन केले जाईल. – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक – राम करण यादव – एमएच ०१ जीइ ४३६३ – पेट्रोल

मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक – रजनीश कुमार गोयल – एमएच ०१ डीबी ३०६८ – पेट्रोल

एमएच ०१ डीटी २९७९ – पेट्रोल/सीएनजी

प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त (पीसीएससी) – अजोय सदनी – एमएच ०१ ईएफ २२८२ – पेट्रोल/हायब्रीड (जानेवारी २०२३ ला वाहनाची नोंदणी)

प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक (पीसीओएम) – एस. एस. गुप्ता – एमएच ०१ बीएफ २५५६ – पेट्रोल – (वाहनाचे आयुर्मान : ११ वर्षे ५ महिने)

प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (पीसीएसटीई) ए. के. श्रीवास्तव – एमएच ०१ बीएफ ४२६५ – पेट्रोल ( वाहनाचे आयुर्मान : ११ वर्षे ३ महिने)

प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक (पीसीएमडी) – मीरा अरोरा – एमएच ०१ डीपी ६१२१ – पेट्रोल/सीएनजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता (पीसीएमइ) सुनील कुमार – एमएच ०१ डीके ०५९१ – डिझेल