रेल्वेमार्गावरील आणि रेल्वेगाडय़ांमधील वाढत्या गुन्ह्यांचे खापर नेहमी रेल्वे पोलिसांच्या माथी फोडले जात असले, तरी आता रेल्वे पोलिसांनी अधिक सतर्क होण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी विविध उपाययोजना तर हाती घेतल्याच आहेत, पण फेसबुकवर स्वत:चे पेज सुरू करून तंत्रज्ञानाची मदतही घेतली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया पथका’ची क्षमता वाढवणे, फेसबुकवरून थेट संवाद, प्रवासी सुरक्षा समिती, सीसीटीव्हीचा पाठपुरावा आदी योजनांतर्गत रेल्वे पोलीस दलाचा कायापालट करण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी केला आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर तब्बल ८० लाख मुंबईकर दर दिवशी प्रवास करतात. या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या रेल्वे पोलीस दलावर (जीआरपी) नेहमीच अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला जातो. आपल्या दलावरील हा डाग पुसून काढण्यासाठी नवनियुक्त रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात सिंघल यांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत निर्भया पथकाचे सबलीकरण करायचे ठरवले आहे.
या पथकाची व्याप्ती आता पश्चिम रेल्वेमार्गावरही वाढवण्यासाठी या पथकातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. निर्भया पथकाबरोबरच आता प्रत्येक स्थानकावर एक प्रवासी सुरक्षा समिती स्थापन करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी घेतला आहे.
या समितीमध्ये विद्यार्थी, महिला प्रवासी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, शिक्षक, पत्रकार आणि पोलीस यांचा समावेश असेल. या समितीची बैठक दर महिन्यातून एकदा घेतली जाईल. या बैठकीत सुरक्षाविषयक विविध बाबींचा आढावा घेतला जाणार आहे.
रेल्वे पोलिसांशी संवाद फेसबुकच्या माध्यमातूनही
रेल्वे पोलीस व प्रवासी यांच्यात आपलेपणाचे नाते तयार व्हावे, या उद्देशाने रेल्वे पोलिसांनी आता आपले फेसबुक पेजही तयार केले आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या या पेजवर प्रवासी आपल्या सूचना आणि तक्रारी मांडू शकतील. या तक्रारी थेट रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे पोहोचणार असल्याने त्याची त्वरीत दखल घेतली जाणार आहे. याबाबतची माहिती फेसबुकवर त्वरीत अपडेट केली जाणार असल्याचेही डॉ. सिंघल यांनी सांगितले. प्रवासी आपल्या सूचना आणि तक्रारी http://www.facebook.com/mumbairailwaypolice या फेसबुक पेजवर टाकू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway police alert for ganesh festival
First published on: 28-08-2014 at 05:05 IST