मुंबई : गेले काही दिवस संपूर्ण राज्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस कोकणात हलक्या ते मध्यम सरी बरसतील. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील. पावसाची फरशी शक्यता नसेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, सध्या पावसाचा जोर कमी झाला असून, पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण आणि घाटमाथ्यावर अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीवर गेला असून, राजस्थानच्या जैसलमेर, कोटा, दातिया, रांची, बकुरा ते पूर्व – मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तसेच मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कमी राहील. कोकण, विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सर्वाधिक तापमान अकोला येथे

राज्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली. साधारण गुरुवारपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. परिणामी, तापमानात वाढ झाली. अकोला येथे शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदले गेले. त्याखालोखाल चंद्रपूर येथे ३२.६ अंश सेल्सिअस, नागपूर ३२.९ अंश सेल्सिअस आणि वर्धा येथे ३१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

पावसाचा अंदाज कुठे

हलक्या ते मध्यम सरी

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड,हिंगोली,नांदेड

मेघगर्जनेसह पाऊस

अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ