मोसमी वारे मुंबईत, दिवस मात्र कोरडाठाक

किंचित प्रतीक्षा करायला लावलेल्या मान्सूनने सोमवारी मुंबईपर्यंत आघाडी मारली. हे पाऊसवारे मुंबई ओलांडून उत्तरेला वलसाड, नाशिकपर्यंत पोहोचले असल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले असले, तरी मुंबईकरांना सोमवारी दिवसभर पहिला पाऊस मुसळधार अनुभवता आला नाही. कुलाबा व सांताक्रूझ येथे सोमवारी दिवसाउजेडी पावसाचा टिपूसही पडला नाही. रविवार-सोमवारच्या मध्यरात्री कुलाबा येथे तब्बल ९४ मिमी तर सांताक्रूझ येथे ४२ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी रात्री मुंबई,ठाणे आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाच्या सरी आल्याने पावसाची आरंभीच रात्रपाळी असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या आठवडय़ात मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पाऊस पडला होता. रविवारी मोसमी वारे रायगडच्या श्रीवर्धन किनाऱ्यापर्यंत पोहोचले होते. त्यातच मुंबई परिसरात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे मुंबईकर दरवर्षीप्रमाणे पावसाच्या धमाकेदार प्रवेशाकडे डोळे लावून बसले होते. प्रत्यक्षात शनिवारपासून मुंबईकरांना दिवसाउजेडी पाऊसच अनुभवता आला नाही. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासात अवघा २ मिमी पाऊस पडला होता. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आभाळ भरून पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी आल्या. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पावसाने दक्षिण मुंबईत जोरदार प्रवेश केला. पहाटे पाचपर्यंत कुलाबा येथे ९० मिमीहून अधिक पाऊस पडला. उपनगरांमध्येही या वेळेत ४२ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मात्र पावसाने मुंबईकरांना दर्शन दिले नाही. मात्र हवामानशास्त्र विभागाने मुंबईसह नाशिक, परभणीपर्यंत पाऊस पोहोचल्याचे जाहीर केले. उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात मात्र मोसमी वारे पोहोचलेले नाहीत.

राज्यात पावसाचे सात बळी

सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात नांदेड जिल्हय़ातील उमरी तालुक्यातील कारला येथे अस्वलदरी माळ परिसरात पाच महिलांचा वीज पडून मृत्यू झाला, तर लातूर जिल्हय़ात रविवारी वीज पडून एकाचा मृत्यू झाला होता. चंद्रपूरमध्ये सोमवारी  शेतशिवारात काम करीत असतानाच वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्य झाला.

पर्जन्यभान

  • राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद म्हसळा येथे १५० मिमी झाली. हण्र येथे १४० मिमी, शहापूर येथे ११० मिमी पाऊस पडला. मुंबईसह कोकण परिसरातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
  • ‘आयएमडी’च्या अंदाजानुसार १६ जूनपर्यंत (शुक्रवार) कोकण व गोव्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.