मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणथळ क्षेत्रातही पावसाने जोर धरला असून सातही धरणांचा पाणीसाठा ९५.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच, सात धरणांपैकी चार धरणे काठोकाठ भरल्यामुळे मुंबईकरांची पाणीचिंता मिटली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी धरणांमध्ये ९२.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. म्हणजेच एका दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात तीन टक्क्यांची वाढ झाली.

मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून आता धरणांमध्ये १३ लाख ७६ हजार ७०३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे धरणांचा पाणीसाठा ८९ टक्क्यांवर स्थिरावला होता. मात्र, मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.

धरणांमध्ये २६ जुलै रोजी मिळून एकूण ८८.८१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. १५ ऑगस्टपर्यंत पाणीसाठा ८९.५२ टक्क्यांपर्यंतच पोहोचला होता. त्यानंतर शुक्रवारी राज्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली. १७ ते २० ऑगस्ट या चार दिवसांत धरणसाठ्यात सुमारे ५ टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी तुळशी तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला होता. त्यानंतर, दोन दिवसांनी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास विहार तलावही काठोकाठ भरून वाहत होता.

सद्यस्थितीत सात धरणात मिळून एकूण ९५.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून ऊर्ध्व वैतरणामध्ये ९१.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मोडकसागरमध्ये १०० टक्के, तानसामध्ये १०० टक्के, मध्य वैतरणामध्ये ९८.६९ टक्के, भातसामध्ये ९३.१९ टक्के, विहारमध्ये १०० टक्के, तुळशीमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत, गेल्या २४ तासांत सात धरणांमध्ये मिळून तब्बल १३११ मिमी एवढा पाऊस कोसळला. सर्वाधिक म्हणजेच २८७ मिमी पाऊस विहार तलावात बरसला. तर, तुळशीमध्ये २९६ मिमी, तानसामध्ये १८४ मिमी पाऊस झाला.