मुंबई : मुंबईसह राज्यातील बहुतांशी भागात पुढील काही दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. त्यामुळे कमाल तापमानात काहीशी वाढ होईल. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला राज्यात ऊन- पावसाचा लंपडाव चालणार आहे. राज्यातील काही भागात पाऊस पडेल तर, काही भागात ऊन – पाऊस अशी स्थिती राहणार आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात मुंबई आणि अन्य भागात कमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे पावसाच्या नोंदीत वाढ झाली. हीच परिस्थिती जूनमध्येही होती. जूनमध्ये काही भागात पावसाची चांगली, तर काही ठिकाणी सामान्य नोंद झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही वाढला. परंतु, सध्या पावसाला पोषक वातावरण नाही. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही. काही भागात किरकोळ पाऊस पडेल, पण त्यानंतर तेथे उघडीप होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जुलै महिन्याची तूट भरून निघाली
राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत फारसा पाऊस नव्हता. साधारण २० जुलैपासून राज्यात सुरू झालेल्या पावसामुळे तूट भरून निघाली. मात्र, आता पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. तर, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसासाठी अनुकूल हवामान असेल. त्यामुळे या काळात पावसाची शक्यता आहे. परिणामी, राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण विदर्भात पाऊस
राज्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण, तसेच विदर्भात मात्र अधूनमधून सरी बरसत आहेत. पुढील दोन – तीन दिवस कोकण, विदर्भात पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारनंतर विदर्भात पावसाचा जोर कमी होणार आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशमध्ये पावसाची उघडीप
राज्याच्या इतर भागात अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशमध्ये पावसाची पुढील काही दिवस तरी उघडीप राहील. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर या भागात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबईची स्थिती काय ?
मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळला. मात्र सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. यापुढील काही दिवस मुंबईत हलक्या सरींचा अंदाज आहे. मुसळधार पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते २९ जुलैपर्यंत ३६७.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ७८५.९ मिमी पाऊस नोंदला गेला आहे.