मुंबई : राज्याच्या सर्व विभागांत गेल्या ४८ तासांपासून जोरदार पाऊस कोसळत असून पावसामुळे किमान आठ जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत बचाव पथकांनी ३०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यभरात साडेचार लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे सहा ते सात गावांत पूरस्थिती आहे.
नांदेड जिल्ह्यात पुरामुळे किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत. जिल्ह्यात सुमारे १५० जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरात अडकलेल्या २९३ नागरिकांची सुटका करण्यात बचाव पथकांना यश आले. रविवारी मध्यरात्री राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (‘एसडीआरएफ’) तुकडी मुखेड परिसरात बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगरहून लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात परळी तालुक्यात कौडगाव येथे सोमवारी पहाटे केंद्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) तुकडी रवाना करण्यात आली. बीडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पुरात अडकलेल्या तीन व्यक्तींना वाचवण्यात यश आले आहे. अकोल्यामध्ये भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबईतील मलबार हिल परिसरात भिंत पडून एकाचा मृत्यू झाला. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली नद्यांनी तसेच रायगड जिल्ह्यामधील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
विदर्भात २ लाख हेक्टर तर मराठवाड्याच्या नांदेड, बीड जिल्ह्यांत २ लाख ५९ हजार हेक्टर पिकांचे पावसाने नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रामुख्याने तूर, कापूस, सोयाबीन पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा
मुंबई : मुसळधार पावसाने रविवारी रात्रीपासून मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याला थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल, आपत्कालीन व पोलीस यंत्रणेला सतर्कतेचे आणि मदतकार्यात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत.