मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याची आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी ५ तास चौकशी केली. एका व्यावसायिकाची ६० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी राज कुंद्रावर आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर एका व्यापाऱ्याची ६० कोटी ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राज कुंद्रा याला चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. राज कुंद्रा सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालायत हजर झाला. त्याची सुमार पाच तास चौकशी करण्यात आली.
वैयक्तिक कामासाठी पैसे खर्च
या चौकशीदरम्यान कुंद्रावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत त्याची बाजू ऐकून घेण्यात आली. गुंतवलेले पैसे कुठे वापरले आणि कोणत्या उद्देशासाठी खर्च झाले याचा तपास करण्यात येत आहे. चौकशीदरम्यान राज कुंद्रा याने पाच कंपन्यांमध्ये पैसे वळविल्याची कबुली दिली. सतयुग गोल्ड, विहान इंडस्ट्रीज, इसेन्सिशअल बल्क कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेड, बेस्ट डिल आणि स्टेटमेंट इंडिया या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. कुंद्राच्या बॅंक खात्याच्या तपशीलांवरून त्याने २५ कोटी वैयक्तिक कामासाठी खर्च केल्याचे आढळले.
शिल्पा शेट्टीलाही समन्स बजावणार
या प्रकरणात शिल्पा शेट्टीचाही जबाब नोंदविला जाणार आहे. मात्र अद्याप तिला समन्स बजावण्यात आलेले नाही. तपासात गरज वाटल्यास तिलाही समन्स बजावण्यात येईल, असे आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे अनेक वेळा परदेशात जात असतात, त्यामुळे ते आता देशाबाहेर जाऊ नयेत, म्हणून लूक आऊट नोटीस काढण्यात आली आहे.
प्रकरण काय ?
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी हे बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मचे संचालक होते. फिर्यादी व्यवसायिक दीपक कोठारी यांनी २०१५ ते २०२३ दरम्यान बेस्ट डील प्रायव्हेट लिमिटेड या कुंद्रा दाम्पत्याच्या कंपनीत ६० कोटी ४८लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. या कंपनीतील ८७.६ टक्के शेअर्स या दोघांच्या नावावर होते. ‘एप्रिल २०१५ मध्ये त्यांनी ‘शेअर सबस्क्रिप्शन ॲग्रीमेंट’अंतर्गत कंपनीत ३१.९ कोटी रुपये गुंतवले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये सप्लिमेंटरी ॲग्रीमेंटअंतर्गत आणखी २८.५३ कोटी रुपये वळवते (ट्रान्सफर) केले. शिल्पा आणि राज यांनी ही रक्कम वैयक्तिक खर्चांसाठी वापरली’ असा आरोप दीपक कोठारी यांनी तक्रारीत केला आहे.