मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवारी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. राज ठाकरे यांनी ‘ मातोश्री ‘ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या.

या भेटीमुळे आनंद द्विगुणित झाल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनीही समाजमाध्यमावर शुभेच्छा संदेश देत मोठे बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे सांगितल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या.

हिंदी भाषा सक्तीविरोधातील शासन निर्णय रद्द झाल्यानंतर विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे २० वर्षांनंतर पहिल्यांदा एकत्र आले. त्यानंतर पुन्हा एकदा आज या दोघांची भेट झाली. विशेष म्हणजे राज ठाकरे तब्बल सात वर्षांनी मातोश्री निवासस्थानी दाखल झाले व त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या आसनाला वंदन केले. याच खोलीत दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली.

यावेळी व्यंगचित्रांवर चर्चा झाली व जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. दोन नेते नव्हे, तर दोन भाऊ भेटल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनीही या भेटीबद्दल आनंद व्यक्त करताना राज ठाकरे यांनी शिवसेना एकच असल्याचा मुद्दा मांडल्याचे नमूद केले.

‘ दोन्ही भावांनी न बोलता करून दाखविले ‘ , अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी या भेटीवर व्यक्त केली. ही भविष्याची नांदी आहे. दुभंगलेला महाराष्ट्र एकसंघ झाला. यासारखा आनंदाचा दिवस असूच शकत नाही. ही युती झालीच, असे समजायचे. पण सध्या कोणतीही निवडणूक नाही, त्यामुळे युतीची चर्चा काय सकाळ – संध्याकाळ करायची असते का, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणे, यात राजकारण पाहण्याची गरज नाही, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ते दिसेल. मात्र काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात जे आहे, ते महाराष्ट्राच्या मनातले आहे, असे म्हणणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन भाऊ एकत्र आले तर वाईट वाटण्याचे काही कारण नाही. मी या भेटीकडे खूप चांगल्या पद्धतीने बघतो. तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे. त्यांचे विचार स्वतंत्र आहेत, भावाभावांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न असल्याचे स्षष्ट केले.