मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोल देण्यास नकार दिल्यानंतर असभ्य शब्दात निर्भत्सना करणाऱ्या टोल कर्मचाऱ्याला धडा शिकविण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी गुरूवारी कळवा येथील खारेगांव टोलनाका पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत फोडला. या घटनेनंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
या घटनेनंतरही राज ठाकरे टोल न भरताच नाशिकच्या दिशेने रवाना झाले. या प्रकरणी पोलीसांनी मनसेच्या १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
कल्याण येथील मनसे महिला पदाधिकारी कल्पना कपोते व अन्य पदाधिकारी गुरुवारी दुपारी ठाण्याकडे येत असताना त्यांनी खारेगाव टोलनाक्यावर टोल देण्यास नकार दिला. त्यामुळे टोल कर्मचाऱ्याने त्यांच्यासोबत हुज्जत घातली असता, टोलनाका परिसरात स्वच्छतागृह आणि रुग्णवाहिनीची व्यवस्था करा मगच टोल घ्या, असे कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्यास सांगितले. मात्र कर्मचाऱ्यांने असभ्य शब्दात त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. तसेच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी अपशब्द
काढले.
या प्रकरणाची माहिती कळताच मनसे पदाधिकाऱ्यांनी खारेगाव टोलनाक्यावर धाव घेतली. तसेच टोल विरोधी जोरदार निदर्शने केली. गुरुवारी राज ठाकरे देखील याच मार्गाने नाशिकडे जाणार असल्याने पोलीसांनी टोलनाक्यावर बंदोबस्त वाढवला होता.
दरम्यान, टोल नाक्याच्या अलीकडेच राज ठाकरे यांनी गाडी थांबवून महिला कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. तसेच या प्रकरणाची दखल घेण्याच्या सुचनाही त्यांनी पोलिसांना दिल्या. त्यानंतर राज गाडीने नाशिकच्या दिशेने निघाले असता, त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि राज यांच्या देखतच त्यांनी टोलनाका फोडण्यास सुरूवात केली.
या हल्ल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी पळ काढला. पोलिसांनी लाठीमार करत कार्यकर्त्यांना चोप दिला. यात ठाणे शहराध्यक्ष निलेश चव्हाण यांनाही पोलिसांनी मारहाण केली. या घटनेनंतरही राज ठाकरे टोल न भरताच नाशिकच्या दिशेने रवाना झाले. तसेच या घटनेनंतर सुमारे १५ ते २० मिनीटे टोल वसूली बंद होती.
या प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशीरा पर्यंत सुरु होती. मनसेच्या महिला पदाधिकारी कपोते यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी टोल कर्मचारी लाखन पगार यास ताब्यात घेतले आहे.
तोवर मनसेचे आंदोलन सुरूच- राज ठाकरे
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2014 रोजी प्रकाशित
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत खारेगावात टोलफोड
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोल देण्यास नकार दिल्यानंतर असभ्य शब्दात निर्भत्सना करणाऱ्या टोल कर्मचाऱ्याला धडा शिकविण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी गुरूवारी कळवा येथील खारेगांव टोलनाका पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत फोडला.
First published on: 20-02-2014 at 05:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray went on kharegaon toll post after women complaint