ठाणे शहर मनसेमध्ये आपसातील लाथाळ्यांना उत आला असून शुक्रवारी मनसेच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त मनसेतील गटबाजीची राज ठाकरे झाडाझती घेणार आहेत. या उद्घाटनाच्या पाश्र्वभूमीवर अंतर्गत राजकारणाला कंटाळून मनसेच्या स्थापनेपासून महिला शहर अध्यक्षा असलेल्या अनुया मिसाळ यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला आहे तर आणखीही महिला व पुरुष पदाधिकारी मनसेला सोडचिठ्टी देण्याच्या तयारीत आहेत.
मनसेतील या पडझडीमुळे कोपरी येथील प्रभाग क्रमांक ५१ मधील पोटनिवडणुकीपूर्वीच मनसेचा ‘निकाल’ लागणार अशी भीती व्यक्त होत आहे. नाराज असलेल्या अनुया मिसाळ यांना अत्यंत असभ्य भाषेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवीगाळ करण्यात आली तसेच प्रचाराला जाण्यास रोखण्यात आल्यामुळेच त्यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेसाठी ठाणे महत्त्वाचे असतानाही मनसेला अजून येथे ‘ठाण’ मांडता आलेले नाही. सुधा चव्हाण अथवा निलेश चव्हाण यांच्यासारख्या उधार-उसनवारांच्या माध्यमातून पक्ष बळकट करता येणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतरही संपर्क अध्यक्ष गिरीश धानुरकर यांनी केलेल्या नियुक्त्यांमुळे तर पक्षाच्या पुरत्या चिरफळ्या उडाल्याचे कार्यकर्त्यांचेच म्हणणे आहे. ज्यांचा पक्षाशी काडीमात्र संबंध नाही, अशांना ‘अर्थपूर्ण’ कारणांसाठी शहर पातळीवर महत्त्वाची पदे देण्यात आली. या साऱ्यात महिला विभागाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले एवढेच नव्हे तर ठाणे शहरातील तीन पोटनिवडणुकांपैकी दोन जागी उमेदवार उभे न करून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांना अप्रत्यक्षपणे मदतही केल्याचे मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या सात वर्षांत ठाणे शहरात तीन वेळा राज ठाकरे यांना शहर अध्यक्ष बदलावा लागला मात्र महिला अध्यक्ष म्हणून अनुया मिसाळ याच कायम होत्या. त्यांच्या नाराजीची दखल घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार एकनाथ शिंदे यांनी अलगदपणे यांच्या शिवसेनेत
खेचले. राष्ट्रवादीतून आलेल्या निलेश चव्हाण यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकांसाठी पक्षाने गिरीश धानुरकर यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यांनी केलेल्या गटबाजीच्या राजकारणामुळे सोळा विभाग अध्यक्षांनी बंड पुकारले होते. ज्यांच्यावर पदांची खैरात करण्यात आली त्यांच्यामागे चार लोकही नसल्याचे आता स्पष्ट झाले असून या पाश्र्वभूमीवर शहर कार्यालयाचे उद्घाटनासाठी येणारे राज ठाकरे जोरदार झाडाझडती घेतील असे सूत्रांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Aug 2013 रोजी प्रकाशित
ठाण्यातील सावळ्या गोंधळाची राज झाडाझडती घेणार
ठाणे शहर मनसेमध्ये आपसातील लाथाळ्यांना उत आला असून शुक्रवारी मनसेच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त मनसेतील गटबाजीची राज ठाकरे झाडाझती घेणार आहेत.
First published on: 30-08-2013 at 03:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray will see the internal conflict in thane mns