मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी माघार घेण्याची मुदत उद्यापर्यंत असली तरी शिवसेना आणि भाजपपैकी कोणीच माघार घेण्यास तयार नसल्याने प्रत्यक्ष मतदान होऊन घोडेबाजार होण्याची चिन्हे आहेत.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने तिसरा तर शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा केल्याने चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत आहे. भाजप तीन जागा लढण्यावर ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तर शिवसेनाही दुसरी जागा लढणार असून महाविकास आघाडीचे चार उमेदवार नक्कीच निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

प्रत्यक्ष निवडणूक झाल्यास अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या २९ आमदारांना महत्त्व येणार आहे. तसेच राजकीय पक्षांच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. माघारीची मुदत संपल्यावर चित्र स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडी व पाठिंबा देणाऱ्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेने दुसरी तर भाजपने तिसरी जागा प्रतिष्ठेची केली आहे.

राज्यसभेची निवडणूक संपताच विधान परिषदेची निवडणूक होत आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याकरिता महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये पडद्याआडून चर्चा सुरू असल्याचे बोलले जात होते. परंतु अशी कोणतीही चर्चा झालेली नाही वा तशी आवश्यकता नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात शक्यतो राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडण्याची परंपरा आहे. याआधी २०१० मध्ये विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा प्रत्यक्ष मतदान झाले होते. तेव्हा मतांची मोठय़ा प्रमाणावर फाटाफूट होऊन काँग्रेसचा चौथा उमेदवार निवडून आला होता, तर भाजपच्या शोभाताई फडणवीस या पराभूत झाल्या होत्या. तत्पूर्वी २००८ मध्ये काँग्रेसच्या मतांमध्ये फाटाफूट होऊन पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे हे पराभूत झाले होते. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकांमध्ये राज्यात यापूर्वी धक्कादायक निकाल लागले होते.