मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ला महायुतीने २७ जागा सोडाव्यात, अशी मागणी ‘रिपाइं’चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी कांदिवलीमध्ये पार पडलेल्या पक्षाच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केली. यावेळी भाजप आमदार प्रवीण दरेकर, गोपाल शेट्टी, ‘रिपाइं’चे गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे, सीमा आठवले उपस्थित होते.
मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता येणार असून ‘रिपाइं’ला उपमहापौर पदाची संधी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचना आठवले यांनी केल्या. नागालँडमध्ये पक्षाचे दोन आमदार असून आसाममध्ये पक्षाला चांगली मते मिळाली आहेत. लवकरच राष्ट्रीय पक्ष म्हणून ‘रिपाइं’ला मान्यता मिळेल. त्यानंतर भाजप हा छोट्या पक्षाला संपवणारा नसून वाढवणारा पक्ष असल्याचे सिद्ध होईल, असे आठवले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संविधान आणि लोकशाही अधिक मजबूत केली आहे. दलित, ओबीसी आणि मुस्लीमांना मोदी यांच्यामुळे न्याय मिळतो आहे. ‘रिपाइ’ पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे आम्ही राष्ट्रीय स्तरावरचे एक मजबुत घटक आहोत, असा दावा आठवले यांनी मेळाव्यात बोलताना केला.