मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणात अटकेत असलेले कबील कला मंचचे रमेश गायचोर यांनी आजारी वडिलांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही त्यांच्या याचिकेची दखल घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) गायचोर यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

विशेष एनआयए न्यायालयाने ही मागणी फेटाळल्यानंतर गायचोर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर गायचोर यांची याचिका सुनावणीसाठी आली असता भूमिका स्पष्ट करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्याची मागणी एनआयएच्या वतीने करण्यात आली. न्यायालयाने एनआयएची ही विनंती मान्य करून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली.

पंच्याहत्तर वर्षांच्या वडिलांची प्रकृती बिघडली असून त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे, त्यांना भेटण्यासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून अंतरिम जामीन द्यावा, अशी मागणी गायचोर यांनी याचिकेद्वारे केली आहे. या प्रकरणातील अन्य सह-आरोपींनाही यापूर्वी अशाच कारणांसाठी तात्पुरता किंवा अंतरिम जामीन मंजूर केला गेला आहे. तथापि, आपल्या प्रकरणात वस्तुस्थितीचा विचार करण्यात विशेष न्यायालय अपयशी ठरले आहे. विशेष न्यायालयाने आजारी वडिलांना भेटण्याची परवानगी देण्यामागील मानवतावादी दृष्टिकोन विचारात घेतला नाही, असा दावाही गायचोर यांनी केला आहे. एल्गार परिषदेच्या आयोजनात सहभागी झाल्याचा आणि जमावाला भडकाविल्याच्या आरोप आरोप गायचोर यांच्यावर असून एनआयएने त्यांना ७ सप्टेंबर २०२० रोजी अटक केली होती.