इंद्रायणी नार्वेकर, लोकसत्ता

मुंबई : आझाद मैदानात होत असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) दसरा मेळाव्याची झळ थेट ‘रावणदहना’ला बसण्याची चिन्हे आहेत. या मैदानावर सध्या दोन संस्थांतर्फे रामलीला कार्यक्रम होत असून, विजयादशमीला त्यात रावणवधाचा प्रसंग साकारण्याचे नियोजन होते. परंतु, शिवसेनेच्या मेळाव्यापूर्वी हे मैदान रिकामे व्हावे, यासाठी ‘नवव्या दिवशीच रावणवध आटोपून घ्या’ असा दबाव आणण्यात आल्याचा आरोप आयोजकांपैकी काहींनी केला आहे. दसरा मेळाव्याचा विचार करून आयोजकांनीही ‘रामलीला’ गुंडाळण्याची तयारी केली आहे.

दादर येथील शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठीचा अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मागे घेतला. त्यानंतर शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानाची निवड करण्यात आली. हा मेळावा शिवाजी पार्कवरील मेळाव्यापेक्षाही विशाल आणि यशस्वी व्हावा, यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, आझाद मैदानावरील रामलीला कार्यक्रमाचा मेळाव्यात अडसर निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> आमदार अपात्रतेच्या ३४ याचिकांच्या एकत्रित सुनावणीवर नार्वेकरांचा महत्त्वाचा निर्णय

दरवर्षीप्रमाणे यंदाही आझाद मैदानावर साहित्य कला मंच आणि महाराष्ट्र रामलीला मंडळ या दोन संस्थांतर्फे रामलीला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमांमध्ये रामायणातील प्रसंग सादर करण्यात येतात. तसेच विजयादशमीला रावणाचा वध साकारून तसेच श्रीरामाचा राज्याभिषेक सादर करून नाटय़मालिकेची सांगता करण्यात येते. मात्र, यंदा हा सोहळा महानवमीलाच आटोपता घ्यावा लागणार आहे. दसऱ्याच्या सायंकाळी होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियोजन तसेच महत्त्वाच्या व्यक्तींच्या येण्याजाण्यासाठी व्यवस्था करता यावी, यासाठी रामलीला आयोजकांना कार्यक्रम आदल्या दिवशी, सोमवारी रात्री दहापर्यंत आवरता घेण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्याची माहिती आयोजकांपैकी महाराष्ट्र रामलीला मंडळाचे उपाध्यक्ष संदीप शुक्ला यांनी केला आहे. त्यासाठी राजकीय दबाव वाढू लागल्याने रामलीला कार्यक्रम आदल्या दिवशीच गुंडाळण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या तयारीबाबत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

आयोजकांमध्ये मतभिन्नता

गेल्या ५० वर्षांपासून आझाद मैदानात रामलीला आयोजित करण्यात येते. करोनाच्या टाळेबंदीचा कालावधी वगळता या परंपरेत खंड पडला नाही. आझाद मैदानावरील रामलीला कार्यक्रमात दसऱ्याच्या दिवशी नाटय़रुपात रावणाचा वध केला जातो. मात्र, यंदा ही प्रथा मोडीत निघणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. दसरा मेळाव्याच्या नियोजनात गैरसोय होऊ नये म्हणून कार्यक्रम आटोपता घेण्याची भूमिका आयोजकांपैकी काहींनी मांडली तर, इतर मंडळींनी सरकारच्या दबावाला बळी पडू नये, असा आग्रह धरल्याचे समजते.

अडसर कशाचा?

आझाद मैदानाला सीएसएमटी स्थानकाकडून आणि फॅशन स्ट्रीटकडून असे दोन प्रवेश मार्ग आहेत. महाराष्ट्र रामलीला मंडळाचे व्यासपीठ आझाद मैदानावरील फॅशन स्ट्रीट येथील प्रवेशद्वाराजवळ आहे. या मार्गाने केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना, नेतेमंडळींना प्रवेश दिला जाणार आहे. त्याठिकाणीच रामलीलाचे व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ दसरा मेळाव्याच्या दिवशी अडसर ठरू शकते. म्हणून ते आदल्या दिवशीच मोकळे करण्याची सूचना देण्यात आल्याचे समजते. सीएसएमटीकडील प्रवेशद्वाराजवळ साहित्य कलामंचचे व्यासपीठ आहे. या रामलीला कार्यक्रमाला कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. ‘आमचा कार्यक्रम दहाव्या दिवशी, दसऱ्यालाच पूर्ण होणार आहे,’ असे या कलामंचचे अध्यक्ष सुशील व्यास यांनी सांगितले.

दसरा मेळावा असल्यामुळे आम्हाला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे यंदा आम्ही नवमीला कार्यक्रम आटोपणार आहोत. सरकारला आम्ही सहकार्य करणार आहोत. त्यांचाही कार्यक्रम व्हावा आणि आमचाही, अशी आमची भूमिका आहे.

रंजित सिंह, संयुक्त महामंत्री, महाराष्ट्र रामलीला मंडळ

रामलीला हा श्रद्धेचा विषय आहे. स्वत:ला रामभक्त आणि हिंदूत्ववादी सरकार म्हणवून घेणाऱ्यांकडूनच वर्षांनुवर्षे सुरू असलेल्या रामलीला कार्यक्रमाला आडकाठी आणली जात आहे. हे पूर्णत: चुकीचे आहे. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वर्षांनुवर्षे चाललेली परंपरा खंडित करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून दबाव आणला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– संदीप शुक्ला, उपाध्यक्ष, महाराष्ट्र रामलीला मंडळ