मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात (राणीची बाग) सिंह पाहण्याची संधी मुंबईकरांना अद्याप मिळालेली नाही. गेली अनेक वर्ष प्रयत्न करुनही प्रशासनाला प्राणीसंग्रहालय सिंह आणण्यात यश आलेले नाही.
भायखळा येथील राणीबाग पर्यटकांचे आकर्षण स्थान बनली आहे. आतापर्यंत राणीच्या बागेत विवध प्राणी आणण्यात आले आहेत. त्यानंतर सिंह आणण्याचा निर्णय प्राणिसंग्रहालय प्रशासनाने घेतला. त्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. याबाबत प्राणिसंग्रहालय प्रशासनाने मागील काही महिन्यांत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना दोन वेळा पत्रव्यवहार करून सिंहाच्या मागणीबाबत विचारणा केली. मात्र, आजतागायत कोणतेही उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे राणीच्या बागेत सिंह दाखल होण्याची प्रतीक्षा कायम आहे.
सध्या राणीच्या बागेकडे सिंहाच्या बदल्यात देण्यासाठी कोणताही प्राणी उपलब्ध नाही. केवळ पेंग्विनचा पर्याय प्रशासनाकडे आहे. परंतु पेंग्विनसाठी असलेली थंड हवामानाची व विशेष देखभालीची व्यवस्था इतर प्राणिसंग्रहालयामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे अन्य प्राणिसंग्रहालयांना सिंहाच्या बदल्यात पेंग्विन घेणे शक्य झालेले नाही.
याआधी जिराफ, गिब्बन माकडाची मागणी
काही वर्षांपूर्वी सक्करबाग प्राणिसंग्रहालयाने सिंहाच्या दोन जोड्यांच्या बदल्यात जिराफ आणि गिब्बन माकडांची मागणी केली होती. मात्र जिराफ आणि गिब्बन माकड राणीच्या बागेत नसल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला होता. त्यावर तोडगा म्हणून जिराफ व गिब्बन माकडांऐवजी झेब्राच्या दोन जोड्या देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेला संबंधित संस्थांकडून प्रतिसादच मिळाला नाही. तेव्हापासून आजतागायत सिंहासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून पाठपुरावा सुरुच आहे. मात्र, तरीही पदरी निराशाच आली आहे.
प्राणिसंग्रहालयातील सदस्य
प्राणिसंग्रहालयात सध्या शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी, अस्वल, हरण, अजगर, तरस, आणि पेंग्विन, वाघ, विविध प्रकारचे पक्षी आहेत. त्याचबरोबर यंदा सुसर आणि काळवीट आणण्यात आले आहेत.