उच्चभ्रू वस्तीतील घरांमध्ये दूरध्वनी करून तेथील महिलांना धमकावून खंडणीची मागणी करणाऱ्या ४९ वर्षीय आरोपीला गावदेवी पोलिसांनी अखेर अटक केली. आरोपी पेडर रोड येथील एका व्यावसायिक महिलेच्या घरी दूरध्वनी करून धमकावत होता. याप्रकरणी महिला व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी खंडणी, विनयभंग व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा >>> मुंबई : प्रतिबंधीत संघटनेचा सदस्य नालासोपाऱ्यातून ताब्यात ; एटीएसची कारवाई
इम्तियाज अब्दुल खुर्दुस अन्सारी(४९) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो कुर्ला कमानी येथील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात धमकावणे, खंडणी, विनयभंग अशा १९ गुन्ह्यांची नोंद आहे. याप्रकरणातील ३२ वर्षीय तक्रारदार घाटकोपर येथील रहिवासी असून व्यवस्थापक म्हणून काम करतात. आरोपीने २४ ऑगस्टपासून १४ सप्टेंबरपर्यंत तक्रारदार यांच्या मोबाइलवर तसेच त्यांच्या मालकिणीच्या राहत्या घरातील लँडलाईनवर सतत फोन करून अश्लील शिवीगाळ केली. तसेच तक्रारदार यांना बलात्कार व हत्या करण्याची धमकी देऊन १० हजार रुपयांची खंडणी मागितली. अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी गावदेवी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> लंपी त्वचा रोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे विशेष आदेश
त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय गिरप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनेश सातार्डेकर व त्यांच्या पथकाने तात्काळ तपास करून साकिनाका काजुपाडा परीसरातुन आरोपीला अटक केली. चौकशी दरम्यान, अन्सारी पेडर रोड, बिडी रोड, नेपियन सी रोड , मलबार हिल, जुहू, गावदेवी, बांद्रा परिसरात विविध उच्चभ्रू लोकांच्या घरात लँडलाइनवर दूरध्वनी करून सुतारकाम करायचे असल्याचे सांगून माहिती घेत असे. त्यानंतर तेथे महिला आढळल्यास वारंवार दूरध्वनी करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागत असे.