मुंबई : आरोपीने पीडितेला नेहमीच गजबजलेल्या जुहू चौपाटीवर नेले आणि भरदिवसा तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असे निरीक्षण नोंदवून बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. याचिकाकर्ता २०२१ पासून कारागृहात असून या प्रकरणी अद्याप आरोप निश्चितीही झालेली नाही. या पार्श्वभूमीवर याचिकाकर्ता जामीन मिळण्यास पात्र असल्याचेही न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकलपीठाने त्याला जामीन मंजूर करताना नमूद केले.

पोलिसांच्या आरोपांनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असून ओशिवरा येथे घरकाम करत होती. त्यावेळी तिची सुरक्षा रक्षक म्हणून करणाऱ्या याचिकाकर्त्याशी ओळख झाली. पुढे त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. घटनेच्या दिवशी, म्हणजेच १४ मे २०२१ रोजी ईद – उल – फित्रच्या दिवशी याचिकाकर्ता पीडितेला जुहू चौपाटी येथे घेऊन गेला. त्याने तिथे तिला लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, पीडितेने ती नाकारली. या गोष्टीचा राग आलेल्या याचिकाकर्त्याने पीडितेला धमकावले आणि बळजबरीने समुद्रकिनारी असलेल्या दगडांच्या मागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी याचिकाकर्त्यावर भारतीय दंड संहितेनुसार बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातर्गंत (पोक्सो) गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

मात्र, पीडितेचे वय १९ वर्षांपेक्षा जास्त व २० वर्षांहून कमी असल्याचे निदान झाल्यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गतच्या तरतुदीनुसार याचिकाकर्त्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही, न्यायमूर्ती चव्हाण यांच्या एकलपीठाने आदेशात स्पष्ट केले. तसेच, नेहमीच गजबजलेल्या जुहू चौपाटीवर ईदसारख्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आणखी गर्दी असताना याचिकाकर्त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असा पुनरूच्चार केला. त्याचप्रमाणे, याचिकाकर्त्याला जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.