डोंबिवलीपासून पाच किलोमीटर अंतरावरील खोणी गावाजवळील पाघऱ्याचा पाडा येथे शेतकरी कुटुंबातील नऊ वर्षांच्या  एका मुलीवर सत्तावीस वर्षांच्या तरुणाने शनिवारी दुपारी बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात प्रथम टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप, मानवाधिकार आयोगाचे सदस्य किरीट शहा यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी या तरुणाला अटक केली.
डोंबिवली व आसपासच्या परिसरातील गेल्या दोन महिन्यांतील अशा प्रकारची ही आठवी घटना आहे.
अजित वसंत काळुखे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त राजन घुले यांनी सांगितले, ही अल्पवयीन मुलगी राहत असलेल्या घराच्या शेजारी अजित कुटुंबियांसह राहतो. त्याने तिला फसवून आडबाजूला नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घरी आल्यावर मुलीने घरात घडला प्रकार सांगितला. या मुलीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण चौगुले तपास करीत आहेत.
दरम्यान, शनिवारी दुपारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास आलेल्या या मुलीच्या पालकांना मानपाडा पोलिसांनी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात नुसते बसून ठेवले होते. तुम्ही या आरोपी विरुद्ध पक्के साक्षीदार आणा, मग गुन्ह्य़ाचे बघू अशी उत्तरे संध्याकाळपर्यंत या मुलीच्या पालकांना देण्यात येत होती, असे मानवाधिकार आयोगाचे सदस्य किरीट शहा यांनी सांगितले.
मात्र, सहाय्यक पोलीस आयुक्त घुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र महिरे आल्यानंतर याप्रकरणी तातडीने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.