मुंबईत सध्या ‘एच१ एन१’ म्हणजेच स्वाईन फ्लूचा धोका वाढत असून आठ दिवसांतच रुग्णसंख्या सुमारे पाच पटीने वाढून ६२ वर पोहोचली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी अद्याप एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

यावर्षी जून महिन्यात फारसा पाऊस न पडल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण तुलनेने कमी होते. जूनमध्ये डेंग्यूने डोके वर काढायला सुरूवात केली. जून महिन्यात तर स्वाईन फ्लूचे केवळ दोन रुग्ण आढळले होते. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला आणि साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. शहरात सुरुवातीला डेंग्यूचा प्रादुर्भाव वेगाने वाढायला सुरुवात झाली. त्याचबरोबर स्वाईन फ्लूचा प्रसारही वाढू लागला होता. १७ जुलैपर्यत शहरात डेंग्यूचे ११ रुग्ण आढळले होते. मागील आठवडाभरातच याचा प्रसार वाढला असून २४ जुलैपर्यंत रुग्णसंख्या ६२ वर पोहोचली आहे. महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत यामुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबईत जानेवारी ते २४ जुलैपर्यंत फ्लूचे ६६ रुग्ण आढळले आहेत.

करोना साथीच्या काळात २०२० आणि २०२१ मध्ये स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव तुलनेने फार कमी होता. मुंबईत फ्लूचे २०२० मध्ये ४४, तर २०२१ मध्ये ६४ रुग्ण आढळले होते. यावर्षी जुलैमध्येच फ्लूच्या रुग्णांची संख्या ६६ वर गेली आहे. येत्या काळात ही रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत डेंग्यूचा प्रादुर्भावही कायम –

मुंबईत डेंग्यूचा प्रादुर्भावही कायम असून जुलैमध्ये ५० नवे रुग्ण आढळले आहेत. जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाण पाणी साचले आणि लेप्टोच्या रुग्णांची संख्याही जूनच्या तुलनेत दुपटीने वाढली. जुलैमध्ये लेप्टोचे ३४ रुग्ण आढळले आहेत. मे, जूनमध्ये वाढत असलेल्या गॅस्ट्रोचे प्रमाण मात्र आता नियंत्रणात आले आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणे –

ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब ही सर्वसाधारण स्वाईन फ्लूची लक्षणे आहेत. गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रुग्णांमध्ये लक्षणे तीव्र होऊन आजार गंभीर स्वरुप धारण करू शकतो. रुग्णाला धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, उलटीतून रक्त पडणे अशी गंभीर लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. या रुग्णाच्या तपासण्या करून त्याला रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे.

ही काळजी घ्यावी –

खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ करावे, डोळे, नाक, तोंडाला स्पर्श करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, लक्षणे आढळल्यास स्वत:हून औषधे न घेता वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत.

साथीच्या आजारांची आकडेवारी –

आजाराचे नाव – जून जुलै (२४ जुलैपर्यत) जानेवारी ते २४ जुलैपर्यत

स्वाईन फ्लू – २ ६२ ६६

डेंग्यू – ३९ ५० १७३

मलेरिया – ३५० ३९७ १६४०

लेप्टो – १२ ३४ ६९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गॅस्ट्रो – ५४३ ५२४ ३४३०