मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयाच्या रुग्णकक्षामध्ये उंदरांनी उच्छाद मांडल्याने त्याचा त्रास रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना होत आहे. रुग्णांच्या खाटांवर, औषधे व रुग्णांच्या सामानांसाठी असलेल्या टेबलावर उंदीर फिरत असून त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेने आणि रुग्णालय प्रशासनाने उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी रुग्णांकडून केली जात आहे.

कूपर रुग्णालयात वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कंत्राट संपुष्टात आल्याने रुग्णांचे हाल होत असताना रुग्णालयामध्ये वाढलेल्या उंदरांच्या उच्छादामुळे रुग्ण हैराण झाले आहेत. कूपर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या रुग्णकक्षात उंदरांचा वावर वाढला आहे. हे उंदीर रुग्णांच्या खाटांवरून तसेच त्यांच्या अंगावरून धावत असतात.

यासंदर्भात रुग्णांकडून रुग्णकक्षातील परिचारिकांकडे तक्रार करण्यात येत असली तरी त्यावर तोडगा काढण्यासाठी त्या हतबल ठरत आहेत. तसेच रुग्णांना सामान ठेवण्यासाठी दिलेल्या टेबलावर चढून त्यांचे खाद्यपदार्थ खात असल्याच्या तक्रारी रुग्णांकडून करण्यात येत आहे. यामुळे रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच एखादा उंदीर रुग्णाला चावल्यास किंवा त्याला इजा केल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.

कूपर रुग्णालयात उंदरांचा सुळसळाट वाढला असेल तर त्याबाबत मुंबई महापालिकेच्या पेस्ट कंट्रोल विभागाला तातडीने कळवून उंदीर नियंत्रण उपाययोजना करण्यास तसेच सापळे लावण्याच्या सूचना देण्यात येईल. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णकक्षामध्ये स्वच्छता ठेवण्याच्या सूचना देण्यात येणार आहे. – डॉ. नीलम अंद्राडे, अधिष्ठाता, कूपर रुग्णालय