scorecardresearch

“उपमुख्यमंत्री म्हणाले आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो; हो, पण पहाटे ५ पर्यंत…”, रवी राणांचं अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये चहा पिण्यावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये चहा पिण्यावरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. “अजित पवार म्हणाले आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो. हो, जरूर चहा प्यायलो. मात्र, त्यांनी एका महिला खासदाराला तुरुंगात कशाप्रकारची वागणूक दिली याचीही माहिती घ्यावी,” असं मत व्यक्त केलं. ते सोमवारी (९ मे) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

रवी राणा म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो. हो, जरूर चहा प्यायलो. आम्हाला जेव्हा अटक केली तेव्हा त्यांनी आमचे वकील आणि आम्हाला चहा पाजला. तसेच तुम्हाला जामीन देतो असं सांगण्यात आलं. साडेबारानंतर आम्हाला सांतक्रुजच्या तुरुंगात नेण्यात आलं. याची माध्यमांना माहिती देण्यात आली नाही. आम्हालाही सांताक्रुजच्या लॉक अपमध्ये तुम्हाला बसवू आणि सकाळी न्यायालयात नेऊ असं सांगण्यात आलं.”

“आम्हाला पहाटे ५ वाजेपर्यंत पाणी आणि सतरंजी देखील दिली नाही”

“रात्री साडेबारानंतर नवनीत राणा यांना त्रास देण्यात आला. मी विधीमंडळाचा आमदार असतानाही त्रास दिला. पहाटे ५ वाजेपर्यंत आम्हाला पाणी आणि सतरंजी देखील देण्यात आली नाही. त्या ठिकाणी खासदार नवनीत राणा यांना लॉक अपमध्ये उभं रहावं लागलं. त्या सकाळ्या परिस्थितीची अजित पवार यांनी माहिती घ्यावी. कारण राज्यात मुख्यमंत्री आहे की नाही अशी परिस्थिती आहे. एका महिला खासदाराला कशाप्रकारची वागणूक दिली गेली याचीही अजित पवार यांनी माहिती घ्यावी,” असंही रवी राणा यांनी सांगितलं.

“उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून झालेल्या कारवाईची तक्रार दिल्लीला देणार”

रवी राणा पुढे म्हणाले, “एका महिला खासदाराला पोलीस विभागाचा दुरुपयोग करून अत्यंत वाईट वागणूक देणारे द्वेष, खुन्नस आणि अहंकाराने भरलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून झालेल्या कारवाईची पूर्ण माहिती आणि तक्रार दिल्लीला देणार आहे. आज मुख्यमंत्र्यांनी बीएमसीचं पथक आमच्याकडे पाठवलेलं आहे. मी चार दिवसांपासून त्यांची वाट पाहत होतो.”

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर मी राणा दाम्पत्याच्या विरोधात…”, अब्दुल सत्तार यांचं मोठं वक्तव्य

“मुख्यमंत्र्यांनी माझ्या फ्लॅटची ऑनलाईन पाहणी करावी”

“माझा एकच फ्लॅट मुंबईला आहे, त्याची जी चौकशी करायची ती करा. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याची ऑनलाईन पाहणी करावी. त्यांना काही अडचण असेल तर अनिल परब आणि संजय राऊत या तुमच्या उजवा आणि डावा हात असलेल्या लोकांना फ्लॅटचं मोजमाप करायला पाठवा. आम्ही त्यांचं स्वागत करू,” असं म्हणत रवी राणा यांनी बीएमसी कारवाईवर टोला लगावला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ravi rana answer criticism of ajit pawar about drinking tea in police station pbs

ताज्या बातम्या