मुंबई : गेल्या १५ दिवसांमध्ये आफ्रिकेतील देशांमधून ४६६ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी १०० जण मुंबईतील असून त्यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

मुंबईत १२ नोव्हेंबरपासून ४६६ प्रवासी आफ्रिकेतील देशांमधून आले आहेत. यातील १०० प्रवासी मुंबईतील आहेत, तर ३६६ प्रवासी मुंबईबाहेरील आहेत. मुंबईत असलेल्या १०० प्रवाशांपैकी एकालाही करोनाची बाधा झालेली नव्हती. त्यांचा विलगीकरणाचा काळही पूर्ण झालेला आहे.

या प्रवाशांना विलगीकरणाच्या कालावधीत करोनाची बाधा झालेली असल्यास किंवा त्यानंतर लक्षणे दिसून आल्याची शक्यता आहे. दक्षता म्हणून यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काहींच्या चाचण्या सोमवारी केल्या आहेत. आणखी काही प्रवाशांची यादी मंगळवारी मिळणार असून या प्रवाशांच्याही चाचण्या केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे सहायक आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

ठाण्यात प्रवाशांच्या अहवालाची प्रतीक्षा

ठाणे महापालिका क्षेत्रात सात जण दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून आल्याचे समोर आले आहे. विमानतळावर करण्यात आलेल्या करोना चाचणी अहवालामध्ये त्यांना करोना नसल्याचे स्पष्ट झाले. खबरदारी म्हणून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या सात जणांचा शोध घेऊन त्यापैकी पाच जणांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे.  या सात जणांपैकी दोन जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला होता, तर उर्वरित पाच जणांच्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झालेला नाही, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

रुग्णसंख्या राज्यात ५३६ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात दिवसभरात ५३६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २१ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत मुंबई ११५, नगर जिल्हा ६४, पुणे जिल्हा १०३, ठाणे जिल्हा ११० नवीन रुग्ण आढळले. राज्यात ७,८५४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबई : मुंबईत ११५ नवे बाधित, २६९ रुग्ण करोनामुक्त

मुंबईत सोमवारी ११५ नव्या रुग्णांची नोंद झाली. करोनातून मुक्त होणाऱ्यांची संख्याही नव्याने सापडलेल्या रुग्णांपेक्षा अधिक म्हणजे २६९ होती. मुंबईत सोमवारी चार करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या ७ लाख ६२ हजार ७३१वर गेली आहे. मुंबईत सध्या १९ इमारती टाळेबंद आहेत.  

ठाणे : ठाणे जिल्ह्यात ११० करोना रुग्ण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यात सोमवारी ११० करोना रुग्ण आढळून आले, तर एकाही रुग्णाची मृत्यूची नोंद झालेली नाही. ठाणे ग्रामीणमध्ये ५५, ठाणे २६, नवी मुंबई ११, मीरा-भाईंदर ९, कल्याण-डोंबिवली सहा, उल्हासनगर दोन आणि अंबरनाथमध्ये एक रुग्ण आढळून आला.