राज्यातील जनतेची एकसंघपणाची भावना हेच महाराष्ट्राचे बलस्थान आहे. मात्र आज राज्यासमोर सर्वात महत्वाचे आव्हान आहे ते आर्थिक क्षेत्रातील मंदीचे. आर्थिक मंदीच्या या सावटातून बाहेर येण्यासाठी उद्योगधंद्यांचा विकास आणि कायमस्वरुपी रोजगारनिर्मिती करण्याला प्राधान्य देणे महत्वाचे आहे. नव्या औद्योगिक धोरणाची आणि वस्त्रोद्योग धोरणाची जोमाने अंमलबजावणी करुन त्यातून राज्य बाहेर पडेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी येथे व्यक्त केला.
  स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजारोहण केल्यावर राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी हा विश्वास व्यक्त केला. पुढील काळात राज्याचे अग्रस्थान कायम ठेवण्यासाठी कोरडवाहू शेती शाश्वत करणे, राज्य पाणीटंचाई मुक्त, संतुलित औद्योगिक विकास, सुनियोजित नागरीकरण आणि शिक्षणाचा दर्जा वाढविणे या पंचसूत्रीवर भर देण्याची घोषणाही त्यांनी केली.
यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनावर नौदलाच्या गोदीमध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या दु:खाचे सावट पडले असून आवश्यकता भासल्यास नौदलाला सर्वतोपरी मदत केली जाईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राने संपूर्ण देशासमोर एकसंघपणाची भावना जोपासण्याचे उत्तम उदाहरण निर्माण केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कुठल्याही प्रादेशिक वादाला, संकुचितपणाला थारा न दिल्याने राज्य आज भक्कमपणे उभे असून दुष्काळ, अतिवृष्टी असो किंवा आíथक मंदीचे आव्हान, राज्याने प्रत्येक आपत्तीचा मुकाबला करताना हे संकट सर्वच राज्यावर आले आहे, हे मानून त्याचा सामना केला. पावसाच्या अनियमिततेचा कायमस्वरुपी मुकाबला करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून विकेंद्रीत पाणीसाठा करुन पाणीटंचाई कायमस्वरुपी संपविण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच राज्याचा विकास करतांना त्याला मानवी चेहरा असला पाहिजे, हे सूत्र आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयामागे आहे. तसेच तात्पुरती मलमपट्टी करणारे निर्णय घेण्यापेक्षा कायमस्वरूपी विकासाच्या विषयांवर शासनाने भर दिल्याचा दावाही त्यांनी केला.  मुंबईत गेल्या चार वर्षांत पायाभूत विकासाची जी कामे झाली आहेत तशी यापूर्वी कधीही झालेली नाहीत. यावर्षी तब्बल पाच हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. मुंबईप्रमाणेच नागपूर आणि पुण्यातही अनेक पायाभूत  सुविधा प्रकल्प सुरू असून ते लवकरच मार्गी लावले जातील, असेही त्यांनी सांगितले.