मुंबई : भोंगे हटवले नाही तर मशिदींसमोर महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करण्याच्या मनसेच्या इशाऱ्याची गंभीर दखल गृहविभागाने घेतली असून कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बंदिस्त सभागृहातच महाआरती आणि हनुमान चालीसा पठण करा, अशा नोटीसा पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना बजावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई आणि आसपासच्या भागांत ९ मे रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आले असून हनुमान चालीसा पठण बंदिस्त जागेत करावे आणि त्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी, असे पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसांद्वेर बजावले आहे.

मशिदींवर भोंगे उतरविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच याच दिवशी राज्यभर महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाचे आदेशही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. एवढेच नव्हे तर भोंगे हटविले नाहीत तर मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठणाची तयारीही मनसेने सुरू केली आहे. त्यासाठी मनसेच्या मुंबई, ठाणे परिसरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मोक्याच्या ठिकाणी महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागणारे अर्ज केले होते. त्यांची दखल घेत पोलिसांनी आता मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे.

हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमादरम्यान प्रक्षोभक घोषणा, सूचना इत्यादीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी मनसे कार्यकर्त्यांवर असेल, असा स्पष्ट इशाराही पोलिसांनी नोटीशीत दिला आहे. पोलिसांच्या नोटिसांनंतरही मनसे पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्य सरकारच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी दबावासाठी नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. मात्र आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचे मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी सांगितले.

मनसेचा इशारा

भोंग्याला परवानगी आहे, मग महाआरतीला का नाही. राज्यात सरकार कोणाचे आहे असा प्रश्न यानिमित्ताने लोकांच्या मनात येत असून पोलिसांनी परवानी दिली नाही तरी महाआरती होणारच, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.

९ मेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

मुंबईत आणि आसपासच्या भागांत ९ मे रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे महाआरती किंवा हनुमान चालीसापठण बंदिस्त सभागृहातच करावे. त्यासाठी संबंधित महापालिकेची परवानगी घ्यावी, अशी सूचना पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना केली आहे.