लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत (एमओईएफसीसी) वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने नवी मुंबईतील एनआरआय पाणथळ क्षेत्र संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे.
नवी मुंबईतील टी. एस. चाणक्य सागरी प्रशिक्षण संस्थेच्या मागे असलेला चाणक्य तलाव, एनआरआय परिसरातील एनआरआय तलाव आणि डीपीएस तलाव या तीन पाणथळ जागांवर मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो, तसेच दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास आढळतो. दरम्यान, यापूर्वी एनआरआय पाणथळ क्षेत्रावर गोल्फ कोर्स उभारण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने एमओएफसीसीला सादर केलेल्या पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवालात गोल्फ कोर्स रद्द करण्यात आला. याचबरोबर डीपीएस तलावाचे मूल्यांकन करताना राज्य वन विभागाने त्याच्या आजूबाजूच्या पाणथळ क्षेत्रांचाही समावेश करावा, असे नमूद केले होते.
आता वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेनेही एनआरआय पाणथळ क्षेत्राला संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या नॅटकनेक्ट फाऊंडेशन या संस्थेने एनआरआय तलावाच्या संरक्षणासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष बी. एन. कुमार यांनी सांगितले.
नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटचे सर्वेक्षण
चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंटने अलिकडेच पाणजे, एनआरआय आणि टी. एस. चाणक्य या पाणथळांचे सर्वेक्षण केले आहे. याचबरोबर राज्य पर्यावरण विभागाने या पाणथळ जागा संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करावे असे नमूद केले आहे.
पर्यावरणीय आव्हाने
या तलावाच्या आसपासच्या भागात अनधिकृत बांधकामे आणि खारफुटी नष्ट होण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम झाला आहे. स्थानिक पर्यावरणप्रमेंनी याविरोधात अनेकदा आंदोलनेही केली आहेत.
पर्यावरणप्रेमींची मागणी
डीपीएस तलाव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता एनआरआय तलावालाही संरक्षणाचा दर्जा मिळावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
एनआरआय महत्त्वाचे का ?
- दरवर्षी हजारो फ्लेमिंगो येथे येतात. याशिवाय इतरही पक्षी येथे आढळतात.
- तलावातील खारफुटी परिसरातील पाण्याचा साठा आणि निचरा नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
संरक्षण न मिळाल्यास धोके
- फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांचे स्थलांतर थांबू शकते.
- जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
- परिसरात जलप्रदूषण वाढण्याची शक्यता.
पूर्वीचे स्वरुप
- निसर्गसंपन्न आणि मोकळा परिसर
- स्थालांतरित पक्ष्यांचा अधिवास
आताचे स्वरुप (२०२० नंतर)
- अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण
- खारफुटीची नासधूस
- प्रदूषणाचा वाढता प्रभाव