मुंबई : होळीनिमित्त मुंबईस्थित कोकणवासीय मूळगावी जाण्यास निघाले आहेत. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांसह विशेष रेल्वेगाड्याही पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नसल्याने, त्यांनी एसटीची वाट धरली. मात्र एसटीच्या बसही पुरेशा नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.
काहीच दिवसांवर होळी आली असून, आरक्षित रेल्वे तिकीट असलेले प्रवासी कोकणाच्या दिशेने निघाले आहेत. मात्र अनेकांचे तिकीट प्रतीक्षा यादीत असल्याने कोकणात कोणत्या मार्गाने जायचे असा प्रश्न पडला आहे. नियमित रेल्वेगाड्यांची यादी ३०० च्या पुढे गेली आहे. विशेष रेल्वेगाड्यांची आरक्षित तिकीट मिळत नाहीत. अनेक रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादीही क्षमतेपेक्षा अधिक असल्याने, प्रवाशांना तिकीट काढणे देखील कठीण झाले आहे. एसटी गाड्याही संपूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. अनेक प्रवासी खासगी बसकडे वळले. मात्र, खासगी बसचे अव्वाच्या सव्वा तिकिट दर बघून प्रवास कसा करायचा, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
हेही वाचा >>> प्रिया दत्त सध्या आहेत कुठे? पक्षांतराच्या चर्चांवर दत्त यांचे उत्तर
होळी जसजशी जवळ येत आहे, तशा रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार जादा रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने होळीनिमित्त १२४ विशेष रेल्वेगाड्या आणि पश्चिम रेल्वेने १३० विशेष रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांना होणारी गर्दी विभाजित करणेही शक्य होईल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
– कोकणकन्या एक्स्प्रेसच्या शयनयान डब्याची २२ मार्च रोजी प्रतीक्षा यादीतील नोंदणीही बंद करण्यात आली आहे. तर, २३ मार्च रोजी ४०० प्रतीक्षा यादी, २४ मार्च रोजी २८० प्रतीक्षा यादी आहे.
हेही वाचा >>> विनयभंगप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक, दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप
– तुतारी एक्स्प्रेसच्या शयनयान डब्याची २२ मार्च रोजीची २२७ प्रतीक्षा यादी आहे. तर, २३ मार्च रोजी प्रतीक्षा यादी रिग्रेट आहे. २४ मार्च रोजी ३९५ प्रतीक्षा यादी आहे.
– मांडवी एक्स्प्रेसच्या शयनयान डब्याची २२ मार्च रोजीची २६८ प्रतीक्षा यादी आहे. तर, २३ मार्च रोजी प्रतीक्षा यादी ३८७ आहे. २४ मार्च रोजी ३९६ प्रतीक्षा यादी आहे.
– जनशताब्दी एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणी डब्याची २२, २३, २४ मार्च रोजीच प्रतीक्षा यादीतील नोंदणीही बंद करण्यात आली आहे.
( वरील गाड्या आणि आसन स्थिती २१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची आहे)
– मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरू नगर, बोरिवली नॅन्सी काॅलनी, खोपट, ठाणे वंदना या महत्त्वाच्या बस स्थानकावरून नियमित सुटणाऱ्या सुमारे दीड हजार बस आरक्षित झाल्या आहेत.
– कोकणाशिवाय मराठवाडा, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार येथे जाणाऱ्या नियमित बस आरक्षित झाल्या आहेत. – होळीनिमित्त २० ते २५ या कालावधीत मुंबई, पालघर, ठाणे या विभागातून एसटी बसचे १०२ गट आरक्षण झाले आहे. १७३ बस आरक्षित झाल्या आहेत.