मुंबई : प्रसिद्ध संकलक व दिग्दर्शक व्ही. एन. मयेकर यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली असा परिवार आहेत. त्यांच्या पार्थिवावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह मनोरंजनसृष्टीतील मंडळी उपस्थित होती.
व्ही. एन. मयेकर सुरुवातीला प्रसिद्ध चित्रपट संकलक जी. जी. मयेकर यांचे सहाय्यक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रपट संकलनाचे धडे गिरवले. त्यानंतर हळूहळू शिकत बी. आर. चोप्रा फिल्म्स निर्मित व बासू चॅटर्जी दिग्दर्शित ‘छोटी सी बात’ हा पहिला चित्रपट त्यांनी संकलित केला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि मयेकर यांनाही विशेष ओळख मिळाली. त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटांचे संकलन केले, यापैकी विविध चित्रपटांना पुरस्कारही प्राप्त झाले. त्यांच्या ‘घातक’ व ‘घायल’ या चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
मयेकर यांचे ‘दामिनी’, ‘अस्तित्व’, ‘पुकार’, ‘विवाह’, ‘शौकीन’, ‘हथियार’, ‘अंदाज अपना अपना’, ‘फिदा’, ‘अपने पराये’, ‘पिताह’, ‘खाकी’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यांनी ‘तो बात पक्की’ या केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे संकलन केले. त्या चित्रपटातील त्यांचे काम पाहून त्यांना केदार यांनी ‘श्रीमंत दामोदरपंत’चेही काम दिले. त्यांनी बासू चटर्जी, राजकुमार संतोषी, सूरज बडजात्या, महेश मांजरेकर, राहुल रवैल आदी दिग्दर्शकांबरोबर काम केले होते. तसेच त्यांनी नितीश भारद्वाज, वर्षां उसगावकर, प्रशांत दामले यांच्याबरोबर ‘पसंत आहे मुलगी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. तसेच त्यांनी ‘जन्मदाता’, ‘मी तुझी तुझीच रे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
दरम्यान, मयेकर यांनी चित्रपटांचे संकलन करताना कथाविषयावर सतत लक्ष केंद्रित केले. काळानुसार संकलनाच्या तंत्रज्ञानात होत गेलेले बदल आपलेसे करीत काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांना राज्य शासनाच्या चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत असून एक उत्कृष्ट संकलक हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.