लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पर्यावरणस्नेही पुठ्ठयांपासून तयार करण्यात येणाऱ्या मखरांना या वर्षी मागणी वाढली आहे. पुठ्ठयांपासून तयार केलेल्या मखरांना मुंबईसह कोकण आणि परराज्यातील बडोदे, बंगळुरू, चेन्नई, केरळ, गोवा आदी विविध राज्यांतून पसंती मिळत असून दुबई, अमेरिका, लंडन, मॉरिशस, चीन आदी देशांतूनही या मखरांना मागणी वाढू लागली आहे.

गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात येणारे मखर आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर थर्माकोलचा वापर करण्यात येत होता. परंतु शासनाने थर्माकोलवर बंदी घातल्यानंतर मखर आणि सजावटीसाठी पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर वाढला.

आणखी वाचा-‘मविआ’चे आमदार अव्वल; प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा लेखाजोखा

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘उत्सवी’ संस्थेतर्फे गणेशोत्सवानिमित्त पुठ्यापासून सुवर्ण मखर, सूर्य मंदिर, गणेश महल, झोपाळा, वनराई, नवरंग, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा, कोकणातील उतरत्या छपराचे मंदिर, गड – किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक असणारे हे मखर घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींसाठीही उपलब्ध आहेत. गणेशमूर्तींच्या उंचीनुसार मखरांची निर्मिती केली जाते. घरगुती मखरांचे दर हे १५० रुपयांपासून ५ हजारांपर्यंत आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीचे मखर हे ३ हजार ५०० रुपयांपासून ३५ हजार रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे.

पुठ्ठ्यांपासून नक्षीदार सजावटींचा पर्याय उपलब्ध करून पर्यावरणपूरक मखर बनविण्यास सुरुवात केली. दीर्घकाळ टिकणाऱ्या मखरांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे शक्य आहे.

आणखी वाचा-‘टीस’कडून ‘प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम’वर बंदी; विद्यार्थ्यांची दिशाभूल आणि संस्थेच्या बदनामीचा ठपका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई आणि परिसरात सुमारे दोन लाख घरगुती आणि १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणावर थर्माकोलचा कचरा जमा होत होता. हा कचरा नदी – नाले, वापरात नसलेल्या विहिरी तसेच इमारतींमधील अरुंद गल्ल्यांमध्ये टाकण्यात येत होता. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत होती. परंतु आता सरकारने बंदी घातल्यामुळे थर्माकोलसारखे अविघटनकारी पदार्थांचा वापर टाळण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होत असून या चळवळीला बळकटी मिळत आहे, असे नानासाहेब शेंडकर यांनी सांगितले.