मधु कांबळे

मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) विविध विभागांतील २२ हजार ५८९ पदे भरण्यासाठी मागणीपत्र सादर केले आहे. या पदांमध्ये नऊ हजार अधिकाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन तसेच राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनांनी रिक्त जागा भरण्याचा रेटा लावल्यामुळे पुढील काळात मोठय़ा प्रमाणावर सरकारी नोकरभरती केली जाणार आहे. त्यानुसार विविध विभागांच्या स्तरावर वेगाने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये सुमारे २ लाख ४० हजार पदे रिक्त आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर विशेषत: लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याने कालबद्ध पद्धतीने या रिक्त जागा भराव्यात अशी राज्य शासकीय अधिकारी संघटना व कर्मचारी संघटनांची मागणी आहे. वेगवेगळय़ा कारणाने सरकारी नोकरभरतीवर निर्बंध आणले जात असल्याने सुशिक्षित बेरोजगारांमध्येही विशेषत: सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या युवक-युवतींमध्ये अस्वस्थता आहे.

हेही वाचा >>>शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री प्रचारात; उद्धव ठाकरे यांची टीका

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून राज्य सरकारने या वर्षांत शासकीय सेवेतील ७५ हजार पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे,परंतु मध्यंतरी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतल्याने राज्य सरकारवर टीकेची झोड उठल्याने तो निर्णय शेवटी रद्द करावा लागला. आता सरकारी नोकरभरतीला वेग देण्याची कार्यवाही सुरू आहे.राज्य शासनाचे एकूण ३१ मुख्य विभाग आहेत. या विभागांनी नोकरभरतीसाठी एमपीएससीकडे मागणीपत्रे सादर करण्यास सुरुवात केली आहे. २४ नोव्हेंबपर्यंत ३१ विभागांनी २२ हजार ५८९ पदांची भरती करण्यासाठी मागणीपत्रे सादर केली आहेत. त्यात गट अ-४ हजार, गट ब-५ हजार ५०३ आणि गट क संवर्गातील १३ हजार ८६ पदांचा समावेश आहे. त्यापैकी आता पर्यंत २१ हजार ४८२ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडे ६ नोव्हेंबर रोजी अधिकारी व कर्मचारी संघटनांची बैठक झाली. त्यात रिक्त जागा भरण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी शासकीय सेवेतील रिक्त असलेली दीड लाख पदे भरण्यात येणार असून, त्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्य सचिवांनी बैठकीत दिली. त्यानुसार विविध विभागांकडून एमपीएससीकडे मागणीपत्रे सादर केली जात आहेत. एमपीएससीच्या कक्षेबाहेरील शालेय शिक्षण, महाविद्यालये, विद्यापीठस्तरांवरील शिक्षक तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची पदेही भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्राकडून देण्यात आली. त्यामुळे शासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बाब असल्याचे मानले जाते.