मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि डिजिटल माध्यमांमुळे उद्योगक्षेत्र झपाट्याने बदलत आहे, मात्र उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यवस्थापन शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना अद्यापही पारंपरिक पद्धतीने व्याख्यानाआधारित शिक्षण दिले जात आहे. यामुळे विद्यार्थी निर्णयप्रक्रिया, अचानक उद्भवणाऱ्या समस्या यामध्ये कमी पडत आहेत. ही बाब लक्षात घेत व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी आयआयटी मुंबईतील टेक्नोक्राफ्ट सेंटर फॉर अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजन्स (टीसीए2 आय) मधील संशोधकांनी ‘एमएसगेम्स’ हे अभिनव सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यामध्ये अनुभवाधारित, परिस्थिती अनुरूप शिक्षण आणि खेळात्मक शिक्षणावर भर देण्यात आला आहे.

आयआयटी मुंबईतील प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी यांनी एकत्रित येत तयार केलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये व्यवस्थापन कृती, रणनीती, विपणन, मानव संसाधन, संघटनात्मक वर्तन आणि अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांमध्ये १० संवादात्मक प्रतिकृती तयार केल्या आहेत. या प्रतिकृतीद्वारे विद्यार्थ्यांना वास्तववादी परिस्थितीत निर्णय घेणे, धोरणे बदलणे आणि त्यांचे परिणाम त्वरित अनुभवणे शक्य होणार आहे. ‘एमएस-गेम्स’ हे सिद्धांत आणि व्यवहार यांच्यामध्ये दुवा निर्माण करून विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक सखोलपणे समजून घेण्यास मदत करण्याबरोबरच निर्णयक्षमता आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत करते.

आयआयटी मुंबईने विकसित केलेल्या या सॉफ्टवेअरचा वापर हा देशविदेशातील ५० हून अधिक शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येत आहे. तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे, त्याच वेगाने शिक्षण पद्धतीही बदलणे गरजेचे आहे; अन्यथा ती कालबाह्य ठरेल. देशातच विकसित केलेले हे मॅनेजमेंट फ्लाइट सिम्युलेटर्स त्या आव्हानाचे उत्तर आहे, असे या सॉफ्टवेअरचे सह-विकासक आणि आयआयटी मुंबईचे प्राध्यापक टी. टी. निरंजन यांनी सांगितले.

या उपक्रमामागे टेक्नोक्राफ्ट समूहाचे संस्थापक आणि आयआयटी मुंबईचे डिस्टिंग्विश्ड अल्युम्नस अवॉर्ड प्राप्त डॉ. शरद सराफ आणि त्यांचे बंधू सुदर्शन सराफ यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठबळामुळे टीसीए२आय हे केंद्र देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाचे प्रमुख हब म्हणून विकसित झाले आहे. सायबरसिक्युरिटी, डिजिटल ट्विन्स, इंटेलिजंट नेटवर्क्स, स्मार्ट एक्सआर (एआर/व्हीआर), डिजिटल हेल्थ, डिफेन्स इनोव्हेशन आणि डिजिटल इनोव्हेशन अशा सात विशेष प्रयोगशाळांच्या माध्यमातून टीसीए२आय उद्योग, शासन आणि संरक्षण क्षेत्राशी थेट सहकार्य करत आहे.