करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दहावी आणि बारावीची परीक्षा तसेच निर्बंध शिथिल करायचे की अधिक कठोर करायचे यावर विचारविनिमय केला जाईल. रुग्णसंख्या कमी होत नसल्याने निर्बंघ अधिक कडक करण्याचा सल्ला कृती दल व अन्य तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.

करोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठीच सरकारने गेल्या सोमवारपासून कठोर निर्बंध लागू केले. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेशावरून व्यापारी वर्गात संतप्त प्रतिक्रि या उमटली. राज्यात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर आले. सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेने दिला आहे. भाजपने व्यापारी वर्गाला पाठबळ देत त्यांच्या भूमिके चे समर्थन के ले. दुसरीकडे राज्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याने केंद्र सरकारकडून वारंवार कान टोचण्यात येत आहेत. सरकारच्या भूमिके बद्दल टीका होत आहे.

या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. यात करोनाची सद्यस्थिती, लसींचा साठा, निर्बंध शिथिल करणे, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे काय करायचे यावर विचारविनिमय केला जाईल.

राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवावी आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी सूचना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी के ली आहे, तर सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडणारच, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. व्यापाऱ्यांना भाजप व अन्य काही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. करोनाची साखळी तोडण्याकरिता टाळेबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा रुग्णसंख्या कमी होणार नाही, असा इशारा करोना कृती दलाच्या तज्ज्ञ सदस्यांनी सरकारला दिला आहे. यातून मार्ग काढण्यासाठीच मुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांची मते जाणून घेतील.

रुग्णसंख्या कमी होत नसल्याने टाळेबंदी अधिक कडक करावी, असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. या साऱ्यांवर उद्या खल होईल. त्यानंतरच मुख्यमंत्री निर्बंध अधिक कठोर करायचे की शिथिल करायचे याचा निर्णय घेतील.

परीक्षांचे काय होणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी पुढे येत आहे. परीक्षा सध्या पुढे ढकलाव्यात आणि परिस्थिती आटोक्यात आल्यावर त्या घेण्यात याव्यात, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही सरकारला विद्यार्थ्यांची चिंता असल्याचे म्हटले आहे. उद्याच्या बैठकीत राजकीय नेत्यांची मते या विषयावर जाणून घेतली जातील.