मुंबई: निवृत्त सनदी अधिकारी आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या निधी वाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी नेमण्यात आलेल्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर (६५) यांचे सोमवार आकस्मिक निधन झाले. शांत, संयमी आणि मनमिळावू ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या अकाली निधनाने प्रशासनात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घरी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे खुल्लर स्वत:च गाडी चालवत मुंबई सेंट्रल येथील खासगी रुग्णालयात गेले. तेथे डाॅक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच ऋदयविकाराच्या तीव्र धक्याने खुल्लर यांची प्राणजोत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे. मुळचे दिल्लीचे असलेल्या खुल्लर यांनी सन १९८५ मध्ये भारतीय प्रशानस सेवेत निवड झाल्यानंतर भंडारा येथून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला.
शांत, संयमी स्वभाव, सामान्य लोकांशी संवाद साधून विषयाच्या मुळाशी जाऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याची हातोटीच्या जोरावर आपल्या ३२ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत खुल्लर यांनी नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी,नवी मुंबई महापालिका आयुक्त, माहिती तंत्रज्ञान, कृषी, आदिवासी विकास, ऊर्जा, सामान्य प्रशासन आदी विभागांचे प्रमुख म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता.
ठाण्याचे जिल्हाधिकारी असताना राज्यातील पहिले नागरी सुविधा केंद्र अर्थात सेतू केंद्राची खुल्लर यांची कल्पना पुढे राज्यात सेतू सुविधा केंद्र म्हणून खूप गाजली. सेवानिवृत्तीनंतर ऊर्जा नियामक आयोगाचे सदस्य, सातव्या वेतन आयोग त्रुटी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. दोन महिन्यांपूर्वीत सरकारने त्यांची सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर कृषी खात्यात काम केले होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.