मुंबई : ‘प्राच्यविद्या’ क्षेत्रातील संशोधनाची दोन शतकांची परंपरा राहिलेल्या ‘फोर्ट’मधील ‘दि एशियाटिक सोसायटी’मध्ये (मुंबई) एकगठ्ठा सभासद नोंदणी करत संस्थेवर वर्चस्व मिळवण्याचा उजव्या विचारसरणीच्या अभ्यासक-कार्यकर्त्यांचा डाव आहे. संस्था भगव्या गटाच्या हाती जावू नये, यासाठी पुरोगामी अभ्यासक हे सभासद नोंदणीसाठी आवाहन करत आहेत. यामुळे यंदा सभासद नोंदणीचा दोनशे वर्षातील विक्रम झाला असून: ‘एशियाटिक’मध्ये अक्षरश : ‘अर्ज महापूर’ आला आहे.
२१ पदाधिकारी संस्थेचा कारभार पाहतात. येथील निवडणूक पॅनेल पद्धतीने होत नाही. दरवर्षी निवृत्त एक तृतियांश जागांसाठी मतदान होते. यावेळी ५ कार्यकारणी सदस्य, ४ उपाध्यक्ष आणि अध्यक्ष व सचिव यांची ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक आहे. ३६३८ सभासदांच्या या संस्थेत मतदानाला फक्त शंभर ते दीडशे सभासद येतात. सभासद होण्यासाठी अनुमोदक आणि सूचक म्हणून जुन्या सभासदांची शिफारशीची अट होती. मात्र करोना काळात ती हटविण्यात आली. याचा लाभ उठवत उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी दरवर्षी १०० ते १२५ नवे सभासद नोंदणीची मोहीम चालवली आहे.
यंदा ३५० नवे सदस्य नोंदले आहेत. यातील काही दहावी सुद्धा नाहीत. अनेक नवे सभासद झेरॉक्स वगैरे व्यवसाय करणारे असून काही कुटुंबे सदस्य बनली आहेत. वाढत्या अर्जप्रकरणी छाननी समिती मध्ये मतभेद झाले. पण मतदान घेवून सभासद अर्ज एकगठ्ठा मंजूर करण्यात येत आहेत. धक्कादायक म्हणजे, सभासद नोंदणीचे शुल्क बड्या राजकीय पक्षाने पुरवल्याचा आरोप झाला आहे. नोंदणीची मुदत १५ ऑक्टोबर असून संस्थेकडे १५० अर्ज अद्याप मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. मतदानासाठी नव्या सभासदांना कालावधीची अट नाही.
उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते-अभ्यासक हे सभासद नोंदणी वाढवत असल्याचे लक्षात आल्यानंतर निवडणूक संहितेत सुधारणा करण्यासाठी ॲड. ए. व्ही. गोपालकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली. नव्या सभासदांना दोन वर्ष मतदान अधिकारी नाही, ७५ वर्षे वयांवरील सभासदांना निवडणूक बंदी आणी दोन वेळा सलग पदाधिकारी राहिलेल्यांस दोन वर्ष निवडणूक लढवता येणार नाही, अशा सुधारणा समितीने सुचवल्या. मात्र व्यवस्थापक मंडळाने त्याला केराची टोपली दाखवली. पाणी गळ्यापर्यंत आल्यावर सप्टेंबर मध्ये निवडणुक समितीच्या अहवालासंदर्भात सभा बोलावली गेली. पण, धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारीची भीती दाखवत विरोधी गटाने सभा बारगळवली
यावेळच्या निवडणुकीला धार्मिक रंग :
यावेळीच्या निवडणुकीला ‘पारशी-बोहरी’ विरुद्ध ‘मराठी’ रंग आहे. ही संस्था काँग्रेसच्या निवृत्त खासदारांसाठी ‘थांबा’ असून पारशी महिलांचा ‘किट्टी पार्टी क्लब’ असल्याचा प्रचार विरोधी गट करतो आहे. दुसरीकडे ‘एशियाटिक वाचवण्यासाठी सभासद व्हा’, अशी मोहीम पुरोगामी अभ्यासक-कार्यकर्ते राबवत आहेत. ‘सभासदांमध्ये सर्वाधिक ब्राह्मण असून संस्थेवर पारशी वर्चस्व नाही, असा व्यवस्थापकीय मंडळाचा दावा आहे.
एशियाटिकचे भगवीकरण होणार :
१० जागांसाठी निवडणूक लावण्याचा व्यवस्थापकीय मंडळाचा मानस आहे. वर्ष २०२३ मधील निवडणूक नियमबाह्य असल्याचा धर्मादाय आयुक्तांनी निवाडा दिलेला असून त्या निवडणुकीत निवडून आलेल्या पाच जागांचीही निवडणूक घ्यावी, अशी मागणी विरोधी गटाकडून होत आहे. परिणामी, २१ पैकी १६ जागांसाठी निवडणुकीची शक्यता असून नव्या सभासदांची विक्रमी नोंदणी केल्याने उजव्या विचारसरणीच्या गटाने आगामी निवडणूक जिंकल्यात जमा आहे.
आम्ही गाफील राहिलो :
संस्थेचा दोनशे वर्षाचा कारभार धर्मनिरपेक्ष राहिला असून इथले वातावरण बहुसांस्कृतिक राहिलेले आहे. अकादमीक क्षेत्रातली ही संस्था ताब्यात घेण्यासाठी विशिष्ट विचारसरणीची मंडळी असा मार्ग चोखाळतील याचा अंदाज आला नाही. सभासदत्वाचे नियम सैल करण्यामागे आणि निवडणूक सुधारणा अंमलात न आणण्यामागे आमचा उदार दृष्टीकोण होता. प्रा. विस्पी बालापोरिया, अध्यक्ष, दि एशियाटिक सोसायटी, मुंबई</p>
सभासद वाढ गैर नाही:
संस्थेला नवीन आणि सक्रिय सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. ग्रंथालयाच्या सदस्यत्वाबद्दल पूर्वी फारसे माहिती नव्हते. संस्थेच्या गंभीर परिस्थितीबद्दल अनेकांना रस निर्माण झाला आहे. त्यामुळे नवीन सदस्य येत आहेत. सोसायटीच्या पात्रता निकषांनुसार नवीन सदस्यत्व दिले जाते. मला त्यात काही चुकीचे वाटत नाही. वैजयंती चक्रवर्ती, सदस्य, सभासद छाननी समिती