मुंबई : रस्ते कॉंक्रीटीकरणाची जी कामे सध्या मुंबईत सुरू आहेत त्या कामांना आता वेग आला असून कामांचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे. काँक्रिट ओतण्याची कामे २० मे पर्यंत पूर्ण करावीत. तसेच दिनांक ५ जून २०२५ नंतर महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाचे एकही रस्तारोधक (Barricades) रस्त्यावर दिसता कामा नये, असे आदेश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

मुंबई महापालिकेने मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. हाती घेतलेली कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान मुंबई महापालिकेच्या यंत्रणेपुढे आहे. रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. दिनांक ३१ मे पूर्वी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण व्हावे, यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या विकास कामांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला. तसेच संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले, प्रत्येक रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी निश्चित तारीख ठरविण्यात आली आहे. दिनांक ३१ मे नंतर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकाही रस्त्याचे काँक्रिटचे काम सुरू राहणार नाही याची दक्षता घ्यावी. चौक ते चौक रस्ते काम पूर्ण करण्यावर भर द्यावा. रस्ते खोदकामास यापूर्वीच मनाई करण्यात आली आहे.

पावसाळ्यात रस्ते वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. २० मे नंतर प्रत्यक्ष काँक्रिट टाकण्याचे कोणतेही काम हाती घेऊ नये. सुरू असलेले रस्ते काम पूर्ण करावे किंवा चौकापर्यंत आणून थांबवावे. त्यानंतर क्यूरिंगसाठी साधारणत: १४ दिवस आणि ‘फिनिशिंग’साठी ३ दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे ५ जूननंतर महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाचे एकही रस्तारोधक (बॅरिकेडस्) रस्त्यावर आढळता कामा नये, असे आदेश बांगर यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या तब्बल १२ हजार कोटींच्या महानिविदा

मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांंपासून रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यात टप्प्याटप्प्याने रस्ते कॉंक्रीटीकरण केले जात आहे. मात्र गेल्या दोन वर्षात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रस्ते कॉंक्रीटीकरणाच्या तब्बल १२ हजार कोटींच्या महानिविदा काढल्या आहेत. ही कामे येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एकाचवेळी तब्बल ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. मुंबईत एकूण दोन हजार किमी लांबीचे रस्ते असून त्यापैकी तब्बल ७०१ किमी लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.