मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी सकाळपर्यंत सुरू होता. त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणचे रस्ते जलमय झाले. परिणामी, मुंबईतील अनेक भागांतील वाहतूक मंदावली. जलमय झालेल्या काही रस्त्यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली.
सोमवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने सखलभाग जलमय होण्यास सुरुवात झाली. मुंबईत संततधार कोसळू लागताच हिंदूमाता, सक्कर पंचायत, शीव रस्ता क्रमांक २४, शेख मिस्त्री दर्गा मार्ग, वडाळा पूल मार्ग यांसह अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. अंधेरी भुयारी मार्ग, मिलन भुयारी मार्ग येथे दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक एस. व्ही. रोड, डी. एन. नगर चौकी येथून वळवण्यात आली होती.
वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागल्याने नागरिकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास वरळी सागरी सेतू, ताडदेव येथील महालक्ष्मी जंक्शन आणि गमाडिया जंक्शन यासह अन्य काही भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीची गती मंदावली. यासह आयबी पटेल पेट्रोलपंप, पश्चिम द्रुतगती मार्गावरील उत्तरेकडे जाणारी वाहतूक, नेताजी पालकर चौक येथील वाहतूक, एवरार्ड नगर येथील दक्षिणेकडे जाणारी वाहतूक, दत्ता राम लाड मार्ग भायखळा येथील वाहतूक, मानखुर्द रेल्वे पूल येथे संथ गतीने वाहतूक सुरू होती. मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी जलमय झालेल्या परिसरात धाव घेऊन पाणी उपसा करणारे पंप कार्यान्वित करून साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र दुपापर्यंत पडणाऱ्या संततधार पावसामुळे सखलभागात साचलेल्या पाण्याचा निचरा संथगतीने होत होता. सायंकाळी मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने सखल भागातील पाणी ओसरले.
चार दिवस जोर कायम
संपूर्ण राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत धोक्याचा इशारा आणि मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घाट भागात सोमवारीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारीही येथे पावसाचा जोर कायम होता, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली. दरम्यान मंगळवारी सकाळी साडेआठपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सांताक्रूझ केंद्राने २४.२ मिमी, तर कुलाबा केंद्राने १८.६ मिमी पावसाची नोंद केली.
नागपूरमध्ये सात जण बुडाले
विदर्भात मुसळधार पावसाचे थैमान सुरूच आह़े सावनेर तालुक्यात वाहनासह सात जण वाहून गेले. नांदागोमुख-छत्रापूर मार्गावरील छोटय़ा पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना चालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. काही मीटर पुढे जाताच सातही जणांसह वाहन बुडाले. यात तीन महिला, दोन पुरुष, एक दहा वर्षांचा मुलगा, वाहनचालकाचा समावेश आहे.