चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरी आदी गुन्ह्य़ांमध्ये अटकेत असलेल्या दोन आरोपींनी धारावी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सोमवारी पलायन केले. पोलीस कोठडीतील स्वच्छतागृहाजवळील खिडकीचे गज वाकवून हे आरोपी पळून गेले.
सुरेश कुंचिकोरवे (२७) आणि सतीश कुंचिकोरवे (२५) या दोघांना धारावी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्य़ात अटक केली होती. धारावी परिसरात राहणाऱ्या या दोघांविरुद्ध शाहू नगर, माहीम आणि धारावी पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्य़ांची नोंद आहे. या दोघांनाही १८ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास या दोघांनी पोलिसांना चकमा देत पलायन केले.  या दोघांना पकडण्यासाठी विशेष पथक तयार केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त (कुर्ला विभाग) प्रकाश लांडगे करीत आहेत.