विनायक डिगे, लोकसत्ता

मुंबई : रुग्णांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई महापालिकेडून शीव आणि केईएम रुग्णालयात लवकरच रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत निविदा काढण्यात येणार असून अगदी माफक दरामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

अचूक, सुलभ पद्धतीने आणि अवघडातील अवघड शस्त्रक्रियाही यंत्रमानवाकडून (रोबोटिक) सहज करता येते. परदेशात बहुतांश शस्त्रक्रिया या यांत्रिक पद्धतीने करण्यात येतात. महाराष्ट्रामध्ये एखाद्याच खासगी रुग्णालयामध्ये यांत्रिक शस्त्रक्रिया केली जाते. अशा शस्त्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रणा महागडी असल्याने भारतात अद्यापपर्यंत रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याकडे कल फारसा नव्हता. मात्र नागरिकांना अद्ययावत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मुंबई महापालिकेने रुग्णालयामध्ये रुग्णांची शस्त्रक्रिया सुलभ, सोपी, विनात्रास व्हावी यासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेतील शीव येथील लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय आणि परळ येथील केईएम रुग्णालयामध्ये प्रथम रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

यासंदर्भातील निविदा प्रक्रिया लवकरच काढण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया व पुढील कार्यवाही पूर्ण होऊन प्रत्यक्ष शस्त्रक्रिया सुरू होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सामाजिक दायित्व उपक्रमातून शस्त्रक्रियेचा खर्च

रोबोटिक शस्त्रक्रियेचा खर्च हा लाखांच्या घरात असतो. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हा खर्च लाखांच्या आतमध्ये असेल. मात्र महापालिका रुग्णालयात येणारे रुग्ण हे गरीब कुटुंबातील आहेत. त्यांना हा खर्चही परवडण्याची शक्यता कमी असल्याने कंपन्यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमातून शस्त्रक्रियेचा खर्च भागविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच सरकारच्या आरोग्य योजनांमध्येही रोबोटिक शस्त्रक्रियेचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

कूपरमध्येही प्रस्तावित ..

मुंबई महापालिकेच्या शीव व केईएम रुग्णालयामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र या रुग्णालयाबरोबरच कूपर रुग्णालयामध्येही रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावालाही लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांना नियंत्रण ठेवणे सोपे..

रोबोटच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करताना त्याच्यावर नियंत्रण ठेवणे डॉक्टरांसाठी सहज व सोपे असणार आहे. डॉक्टर प्रणालीमध्ये नमूद केलेल्या सूचनांबरोबरच तोंडी आदेशही देऊ शकतील. डॉक्टर अन्यत्र कोठेही असल्यास ते यंत्रमानवाला सूचना देऊ शकतील. त्यामुळे शस्त्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे.