मुंबई : गुडघा बदल शस्त्रक्रियेसाठी भारतीय बनावटीची मिस्सो (एमआयएसएसओ) ही प्रगत रोबोटिक प्रणाली प्रथमच मुंबईकरांसाठी उपलब्ध झाली आहे. मिस्सो या रोबोटिक प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रिया नैपुण्य यांचा संगम असल्याने शस्त्रक्रियेत अचूकता येण्याबरोबरच रुग्ण जलद बरा होण्यास मदत होते. या प्रणालीमुळे अस्थिरोग शुश्रूषा अधिक उत्तम होण्याबरोबरच लोकांना दर्जेदार आरोग्य सुरक्षा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आत्मनिर्भर भारत धोरणाशी संलग्न असलेली मिस्सो प्रणाली ही संपूर्णपणे भारतीय बनावटीची असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रणालीचे कौतुक केले आहे. या प्रणालीमुळे जागतिक दर्जाच्या रोबोटिक शस्त्रक्रिया नागरिकांपर्यंत अधिक प्रमाणात पोहचवण्यास मदत होणार आहे, तसेच अचूकता व किमान छेदन यामुळे उतिंचे (टिश्यू) नुकसान, रक्तस्त्राव व शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरे होण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होत असल्याने मिस्सो प्रणालीने सांधेबदलाच्या गुणवत्तेचा नवा मापदंड स्थापित केला आहे. मिस्सो रोबोटिक प्रणाली ही मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली असून, बुधवारी केंद्रीय उद्योग व पुरवठा मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते तिचे अनावरण करण्यात आले.

मिस्सो प्रणालीच्या बहुगुणांमुळे ती वेगळी ठरते. यामुळे विविध अस्थिरोग शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेने करणे शक्य होते. पारंपरिक रोबोटिक प्रणालींच्या तुलनेत मिस्सो प्रणाली शस्त्रक्रिया कार्यप्रवाहांचे सुसूत्रीकरण करते. गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केलेला रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होणार असल्याचे कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. राजन मोदी यांनी सांगितले.

मिस्सो रोबोटिक प्रणालीची वैशिष्टे

मिस्सो रोबोटिक प्रणालीमध्ये शस्त्रक्रियांचे त्रिमित मापन करण्यासाठी प्रगत संगणन व तात्काळ माहितीसाठा यांचा वापर केला जातो. ज्यामुळे शल्यविशारदांना अचूक छेद घेण्यास व रोपण करण्यास मार्गदर्शन होते. प्रणालीतील सिक्स-जॉइंट रोबोटिक आर्म, ट्रॅकिंग कॅमेरा व सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे तात्काळ सुधारणा करता येतात आणि सांध्यांची स्थिर व नैसर्गिक हालचाल साध्य होते. ‘मिस्सो’ रोबोटिक प्रणालीतील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चलित अचूकता व किमान छेदन यामुळे उतिंचे (टिश्यू) नुकसान, रक्तस्त्राव व बरे होण्याचा कालावधी कमी होतो. यामुळे शस्त्रक्रियेचे उत्तम परिणाम मिळण्याबरोबरच रुग्ण जलद बरा होण्यास मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृत्रिम बुद्धिमत्ता व शस्त्रक्रिया

नैपुण्याचा संगम मिस्सो प्रणालीने अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता व शस्त्रक्रिया नैपुण्याचा संगम घडवून भारतातील अस्थिरोग शस्त्रक्रियांची नवी व्याख्या तयार केली आहे. या स्वदेशी रोबोटिक प्रणालीमुळे अचूकता प्राप्त होऊन रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होऊन त्यांना पुन्हा हालचाल करणे शक्य होते. वैद्यकीय तंत्रज्ञानातील या क्रांतीमुळे अत्याधुनिक अस्थिरोग उपचार अधिक प्रभावीपणे नागरिकांर्यंत पोहचण्यास मदत होणार असल्याचे गुडघा व खांदा शल्यविशारद डॉ. राहुल मोदी यांनी सांगितले.