माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहले होते. त्या पत्रावर आमदार रोहित पवार यांनी भाजपाला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या राजकारण न करण्याच्या आवाहनाचा संदर्भ देत फडणवीस यांना खडे बोल सुनावले. “भाजपचे नेते केवळ राजकारणासाठी चांगल्या गोष्टींकडं दुर्लक्ष करतात,” हे दुर्दैवी असल्याचे पवार म्हणाले. गडकरी यांनी सांगून सुद्धा “राजकारण न करण्याची विरोधी पक्षातील काही नेत्यांची हौस काही फिटत नाही,” असा टोला देखील त्यांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहित पवार म्हणाले, “भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले नितिन गडकरी करोनाच्या बाबतीत राजकारणाच्या पलीकडं जाऊन काम करताना दिसतात, किंबहुना ‘आजच्या करोनाच्या परिस्थितीत राजकारण करू नका,’ अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांची एका कार्यक्रमात कानउघाडणीही केली. मात्र तरीही चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्याची आणि राजकारण न करण्याची विरोधी पक्षातील काही नेत्यांची हौस काही फिटत नाही. आज राज्यातील अनेक प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. याबाबतही त्यांनी एखादं पत्र केंद्र सरकारला लिहिलं तर राज्यातील जनता निश्चितच त्यांचं स्वागत करेल!”

‘भाजपशासित राज्यांमध्ये तर मंत्र्यांच्या नातेवाईकांनाही बेडसाठी तरसावं लागलं’

“इथले विरोधक राज्य सरकारवर टीका करत असताना खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाय योजनांची जाहीर प्रशंसा केली. सुप्रीम कोर्टानेही महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट व ऑक्सिजन पुरवठ्याची स्तुती केली. जागतिक अर्थतज्ञ आणि ‘आरबीआय’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही महाराष्ट्र सरकारचं कौतुक करत महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन बेड तरी पुरवू शकलं, पण इतर राज्यांना तेही करता आलं नाही, असं म्हटलंय. मात्र तरीही राज्यातील भाजपाचे नेते केवळ राजकारणासाठी या सगळ्या चांगल्या गोष्टींकडं दुर्लक्ष करतात, हे दुर्दैवी आहे. एक मात्र खरंय की देशात सर्वाधिक रुग्ण असतानाही आपल्याकडं रुग्णांना बेड मिळाले नाहीत, असं घडलं नाही. पण भाजपशासित राज्यांमध्ये तर मंत्र्यांच्या नातेवाईकांनाही बेडसाठी तरसावं लागलं आणि कित्येक रुग्णांनी उपचाराअभावी जगाचा निरोप घेतला, याबाबत ते का बोलत नाहीत?” असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात राज्यात आम्ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचा आणि राज्य सरकारने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर अन्याय केल्याचा दावा केला. “पण या गोष्टीमध्ये तथ्य असतं तर आज या विभागातील प्रमुख शहरं सोडली तर इतर ठिकाणची रुगणसंख्या स्थिरावताना दिसली नसती”, असे रोहित पावार म्हणाले.

रोहित पावार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला. ते म्हणाले, “आज महाराष्ट्राचा रुग्णवाढीचा दर अर्ध्यावर आला असून मुंबईतही रुग्ण वाढीचा दर झपाट्याने कमी होत आहे. याउलट भाजपाशासित कर्नाटकसह अनेक राज्यात करोना रुग्ण वेगाने वाढत आहेत. आज राजकीय आरोप करत असतांना आपल्या पक्षाचे सरकार ज्या राज्यांमध्ये आहे तिथल्या परिस्थितीचा आपण नीट अभ्यास केल्यास तेथील यंत्रणा किती मोठ्या प्रमाणात अयशस्वी झाली, हे आपल्या लक्षात येईल”

उत्तर प्रदेश, कर्नाटक या भाजपशासित राज्यांमधील रुग्ण प्रवास करून महाराष्ट्रात उपचारासाठी येत आहेत. तिथं मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीही अपुऱ्या पडत असून अनेक मृतदेह गंगा किनारी पुरले जात असल्याचं तर काही नदीत ढकलले जात असल्याचं विदारक चित्र संपूर्ण जगाने उघड्या डोळ्यांनी पाहल्याचे रोहित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar criticized bjp for its politics on corona background srk
First published on: 19-05-2021 at 15:46 IST