मुंबई : गत हंगामात अतिवृष्टी, पुरस्थितीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी राज्यभरातील शेतकऱ्यांना ७३३ कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे. डीबीटी पोर्टलद्वारे ही मदत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.राज्य सरकारने शुक्रवारी या बाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, जुलै ते ऑक्टोबर २०२४, या काळात राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी, पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते.

या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७३३ कोटी ४५ लाख ८४ हजार रुपयांची मदत वितरीत करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात हा निधी वितरीत करण्यात येणार आहे. जिरायती पिके, बागायती पिके आणि बहुवार्षिक पिकांना नुकसानपोटी मिळणारी मदत यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत मिळत होती, आता ती तीन हेक्टरच्या मर्यादेत मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणत्याही लाभार्थ्याला दोन वेळा मदत मिळणार नाही, याची काळजी घ्या. मदत खात्यावर जमा झाल्यानंतर जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.राज्यात अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, वीज कोसळणे, समुद्राचे उधाम आणि आग, अशा विविध बारा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोगी पडावे, यासाठी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत करण्यात येते. राज्यभरात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे १ लाख ७० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने किनारपट्टीला मोठा फटका बसला होता. त्यात किनारपट्टीवरील जिल्ह्यांत १ लाख २४ हजार ११९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या मदतीमुळे दिलासा मिळणार आहे.