मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल येथे सायकल मार्गिका बांधली होती. एमएमआरडीएने २०११ मध्ये कार्यान्वित केलेल्या या सायकल मार्गिकेचा शून्य वापर झाला. त्यामुळे आता ९.९ किमी लांबीची ही मार्गिका हटवून रस्ता पूर्ववत करून बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही अंशी सोडविण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मात्र सायकल मार्गिकेच्या निमित्ताने ८० कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे.
सायकल मार्गिकेच्या उभारणीसाठी तीन टप्प्यात एमएमआरडीएने अंदाजे ५५ कोटी रुपये खर्च केले आहेत. आता सायकल मार्गिका हटवून रस्ता पूर्ववत करण्यासाठी एमएमआरडीए २५ कोटी रुपये खर्च करणार आहे. दरम्यान, एमएमआरडीएच्या या कारभारावर वाहतूक तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही व्यहार्यता न तपासता हा प्रकल्प हाती घेण्यात आल्याचा आरोप तज्ज्ञानी केला आहे. तर सायकल मार्गिकेसारखे प्रकल्प बीकेसीत राबविण्याऐवजी बेस्ट बसची व्यवस्था सुधारण्यावर भर देण्याची मागणी तज्ज्ञांनी केली आहे.
सायकल मार्गिकेचे २०११ मध्ये लोकार्पण
बीकेसीत प्रवास करणाऱ्यांसाठी पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी २०११ मध्ये सहा कोटी रुपये खर्च करून एमएमआरडीएने सायकल मार्गिका उभारली. या सायकल मार्गिकेचे थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. पण या सायकल मार्गिकेचा एक दिवसही वापर झालेला नाही. सायकल मार्गिकेचा वापर नागरिकांनी वाहनतळ म्हणून करण्यास सुरुवात केली. सायकल मार्गिकेचा वापरच होत नसल्याने या प्रकल्पावर टीका झाली, तर ६ कोटी पाण्यात गेल्याचाही आरोप करण्यात आला. सायकल मार्गिकेचा वापर होत नसल्याचे स्पष्ट असतानाही २०१७ मध्ये पुन्हा सायकल मार्गिकेचा प्रकल्प हाती घेण्यात आला. ५ किमी लांबीची सायकल मार्गिकी बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सायकल मार्गिकेची बांधणी करण्यात आली. सुरुवातीला सहा कोटी आणि त्यानंतर पुढे दोन टप्प्यात अंदाजे ५० कोटी रुपये खर्च करून सायकल मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली. मात्र यावेळीही सायकल मार्गिकेचा वापर झाला नाही आणि एकूण ५५ कोटी रुपयांचा चुराडा झाला.
आता सायकल मार्गिका हटवणार
वापराविना पडून असलेली ही सायकल मार्गिका आता मात्र हटविण्यात येणार आहे. बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने हा निर्णय घेतला आहे. सायलक मार्गिका हटवून त्याचे पुन्हा रस्त्यात रुपांतर करण्यात येणार आहे. एकूणच ९.९ किमीच्या लांबीच्या अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करून वाहतूक कोंडी दूर करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. सध्या बीकेसीत वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आता सायकल मार्गिका हटवून रस्ते रुंद केले जाणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे. या रुंदीकरणामुळे अंतर्गत रस्ते प्रत्येकी दोन मार्गिकांऐवजी तीन मार्गिकांचे होणार आहेत. दरम्यान सायकल मार्गिका हटवून रस्ता पूर्ववत करण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. या रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वासही एमएमआरडीएकडून व्यक्त केला जात आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई करावी…
सायकल मार्गिका प्रकल्पाच्या नावे करण्यात आलेल्या उधळपट्टीवर वाहतूक तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली आहे. सायकल मार्गिका कुठे बांधावी, तिचा वापर कुठे होतो याचा अभ्यास करून ती बांधणे आवश्यक होते. पण एमएमआरडीएने तसा अभ्यास न करता हा प्रकल्प राबवला आणि कोट्यवधींचा चुराडा केला. मूळात बीकेसीत असे प्रयोग करण्याऐवजी बेस्ट बस व्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार यांनी दिली. तर व्यवहार्यता तपासणी न करता सायकल मार्गिका बांधणाऱ्या अधिकार्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.