संदीप आचार्य

मुंबई: करोनाच्या लढाईत त्यांचे काम अत्यंत शिस्तबद्धपणे सुरू आहे. एकाच वेळी अनेक आघाड्यांवर हे काम सुरू आहे. एकीकडे लाखभर स्थलांतरीतांना रोजचे भोजन दिले जात आहे तर दुसरीकडे पालिका रुग्णालयात पीपीई किट व मास्कचे वाटप केले जात आहे. महत्वाचे म्हणजे खासगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन आतापर्यंत साडेतीनशे दवाखाने सुरू करायला लावले. डायलिसीसपासून गर्भवती महिलांना रुग्णालयात घेऊन जाणे व आणण्याचे कामही न बोलता अखंडपणे सुरू आहे.

करोना आणि लॉकडाऊन जाहीर होताच त्यांच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली. राष्ट्रीय आपत्ती लक्षात घेऊन आणि मुंबईत जास्त रुग्ण वाढू शकतात याची माहिती मिळाल्यामुळे त्यांनी मुंबईवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. तसं त्यांचं काम संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. पण मुंबईचा प्रश्न मोठा होणार हे माहित असल्याने सर्वात प्रथम त्यांनी मुंबईतील स्थलांतरित मजूर तसेच झोपडपट्टीमध्ये हातावर पोट असलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांच्या सकाळ व संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था केली. आज जवळपास १ लाख ६० हजार लोकांना जेवणाची पाकिटे जातात. यासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात ३८ किचनच्या माध्यमातून जेवण तयार केले जाते.

याशिवाय तांदूळ, गव्हाचे पीठ, मीठ, मसाला व कांदे- बटाटे असा पंधरा दिवसांचा शिधा असलेली जवळपास ८० हजार पाकिटे त्यांनी गरीब वस्त्यांमध्ये वाटली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव सृष्टी व जनकल्याण समितीच्या माध्यमातून लाखो स्थलांतरित व हातावर पोट असलेल्यांना कोणताही गाजावाजा न करता हे काम गेले दीड महिना सुरूच आहे. आताही सरकारने स्थलांतरितांना त्यांच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेताच वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी योजनाबद्ध काम सुरू झाले आहे.

करोनाच्या लढाईत आज मुख्य भूमिका बजावते आहे ती मुंबई महापालिका रुग्णालये. या रुग्णालयांना तब्बल १० हजार पीपीइ किट तसेच मास्क पासून ते सॅनिटाइजरचा पुरवठा संघाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे मुंबई प्रांताचे संघाचे प्रमुख पदाधिकारी संजय नगरकर यांनी सांगितले. जवळपास १२ प्रकारची कामे आम्ही करत असून सध्या खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने व रुग्णालये सुरू करावी यासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील संघ स्वयंसेवक प्रयत्न करत आहेत.

यातून गिरगाव, दादर, चेंबूर, पार्ले, बोरिवली, धारावी आदी भागातील ३२८ डॉक्टरांनी सामान्य रुग्णांसाठी आपले दवाखाने सुरु केले. या सर्व डॉक्टरांची नोंद आमच्याकडे असून या सर्वांना पीपीइ किट, मास्क, सॅनिटाइजर आदी आवश्यक गोष्टी आम्ही दिल्या असून पुढेही नियमितपणे दिल्या जातील. आणखीही खाजगी दवाखाने सुरू व्हावे असा आमचा प्रयत्न सुरु असून एकूण सहा नर्सिंग होम्सही आमच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाली आहेत. याठिकाणीही आम्ही आवश्यक ती सामग्री दिली असून यातून गर्भवती महिला व लक्षणे नसलेल्या सामान्य रुग्णांना उपचार मिळतील. निरामय फाऊंडेशन व दादार येथील वसंत स्मृतीच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे.

याशिवाय डायलिसिसचे रुग्ण, गर्भवती महिला तसेच अपंग रुग्णांसाठी २४ गाड्यांच्या माध्यमातू विनामूल्य रुग्णालयात नेणे व घरी सोडण्याचे काम केले जात असल्याचे संजय नगरकर म्हणाले. तसचे वीस मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने रुग्ण तसेच गरजूंना मानसिक आधार देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सध्या ही मर्यादित स्वरुपात असली तरी आवश्यकतेनुसार त्याचा विस्तार करण्यात येईल, असेही नगरकर म्हणाले. संघपरिवारातील अनेक स्वयंसेवी संस्था आज मुंबईत कोणताही गाजावाजा न करता काम करत असून पडद्यामागील या योद्ध्यांचे मोल ‘अनमोल’ म्हणावे लागेल.