scorecardresearch

‘रुबी’च्या चार डॉक्टरांना अटकेपासून दिलासा

याचिकाकर्त्यां डॉक्टरांना अटक करायची असल्यास पोलिसांनी त्यांना ७२ तास आधी नोटीस देण्याचे आदेश दिले.

मुंबई : अवयव प्रत्यारोपण गैरव्यवहाराप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्यातील रुबी रुग्णालयात कार्यरत शल्यविशारदांसह चार डॉक्टरांवर पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई करणार नसल्याची हमी पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली.

उच्च शिक्षित डॉक्टरांना अटक करण्याची घाई का केली जात आहे, अशी विचारणा न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने केल्यावर पोलिसांनी या डॉक्टरांवर कठोर कारवाई न करण्याचे आश्वासित केले.

त्याचवेळी या डॉक्टरांची केवळ चौकशी करायची असल्याचेही सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले. खंडपीठाने पोलिसांचे म्हणणे मान्य केले. तसेच याचिकाकर्त्यां डॉक्टरांना अटक करायची असल्यास पोलिसांनी त्यांना ७२ तास आधी नोटीस देण्याचे आदेश दिले.

डॉ. हिमेश गांधी आणि या प्रकरणात आरोपी म्हणून समावेश करण्यात आलेल्या अन्य तीन डॉक्टरांनी अटकेच्या भीतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तसेच त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. मूत्रिपड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी अवयव दान करणाऱ्या महिलेच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली होती. ही महिला रुग्णाची पत्नी असल्याचे या कागदपत्रांद्वारे दाखवण्यात आले होते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ruby hospital doctor get relief against arrest in kidney transplant case zws