‘सकाळ तर होऊ द्या’ असं काहीसं बाळबोध शीर्षक असलेला चित्रपट अनपेक्षितपणे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करताना दिसतो आणि थोडा का होईना मनाला दिलासा मिळतो. अर्थात, चित्रपटाचं शीर्षक, आशय, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्या गोष्टी किती जमून आल्या आणि किती फसल्या या बाबी नंतर येतात. मुळात, चित्रपट सुरू झाल्याच्या पहिल्या दृश्यचौकटीपासून ते अगदी श्रेयनामावलीची रांग समोर येईपर्यंत केवळ दोन कलाकारांच्या माध्यमातून दिग्दर्शक आलोक जैन यांनी हा दोन तासांचा चित्रपट रंगवला आहे. नाही म्हटलं तरी कुठलाही मसाला मनोरंजन असलेली कथा वा मांडणी नसताना दोघांभोवती कॅमेरा फिरवत एखादा भावपट रंगवणं हे सध्याच्या काळात धाडसच म्हणायला हवं.

एकप्रकारे चित्रपटाचं शीर्षक बाळबोध असलं तरी त्यातच त्याच्या कथेचं सारही दडलं आहे आणि शब्दश: एका रात्रीत घडणारी गोष्ट दिग्दर्शकाने रंगवली आहे. या चित्रपटासाठी कथालेखन आणि दिग्दर्शन दोन्ही धुरा आलोक जैन यांनीच सांभाळल्या आहेत. एका ओळीत कथा सांगावी आणि ती फारच भन्नाट काहीतरी असावी असा काही प्रकार इथे नाही. दोन भिन्न परिस्थितीत असलेल्या माणसांची गोष्ट आहे. त्या दोघांचा भिन्न आर्थिक – सामाजिक स्तर पाहता एवीतेवी ते दोघं एकमेकांसमोर आले असते वा एकमेकांच्या आयुष्यात डोकावले असते, अशी सुतराम शक्यता नाही. रात्रीच्या वेळी एका निर्जन जागी एकजण स्वत:चं आयुष्य संपवायचा प्रयत्न करतो आहे आणि कुठलीही कल्पना नसताना तत्क्षणी तिथे पोहोचलेली दुसरी व्यक्ती त्या क्षणाचा साक्षीदार होते. आता या दोघांमध्ये नेमकं काय घडेल? पाहणारी व्यक्ती आत्महत्या करणाऱ्याला थांबवेल की जे घडतं आहे ते घडू दे म्हणून पाहात राहील? की समोर अचानक आलेल्या व्यक्तीला पाहून आत्महत्या करणारी व्यक्ती स्वत:चा बेत लांबवेल? अशा अवघड क्षणांत दोन अनोळख्या व्यक्तींमध्ये खेळवलेलं भावनाट्य ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटात पाहायला मिळतं. असं कथाबीज हातात असतं तेव्हा लेखक – दिग्दर्शकाकडे त्याचा विस्तार करण्यासाठी अनेक शक्यता असतात. रात्रीस खेळ चाले… असा गूढ, रहस्यमय खेळ रंगवायचा की आपल्यासमोर काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना नसलेल्या, नियतीच्या फेऱ्यात अडकलेल्या दोघांची वास्तविकतेला धरून पुढे जाणारी कथा रंगवायची? इथे दिग्दर्शकाने पहिल्या गोष्टीचा हुशारीने वापर करून घेत दुसऱ्या पद्धतीने एक साधीसरळ कथा प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाची कथा वर म्हटलं तसं अजिबात नवीन नाही किंवा काहीतरी वेगळ्याच शैलीत, कॅमेरा विशिष्ट अँगलने फिरवत, छायाचित्रणात अंधार-प्रकाशाचा खेळ रंगवत मांडणीही केलेली नाही. आणि तरीही हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत धरून ठेवतो. चित्रपटाचा वेग सुरूवातीपासूनच संथ आहे, त्यामुळे सुरुवातीला कधी कथा पुढे सरकणार? काही घडणार की नाही? असं वाटतं राहतं. मध्यंतरापर्यंत येता येता चित्रपट नाट्यमय वळणापर्यंत पोहोचतो. चित्रपटाची कथा फार रंजक, रहस्यमय नाही. शैलीचा प्रयोग नाही आणि दोन कलाकारांवरच कॅमेरा रोखलेला असणार त्यामुळे त्यात थोडा वेगळेपणा ठेवण्यासाठी दिग्दर्शक आलोक यांनी कुठे नाट्यमयता वाढवायची, कुठे गोष्ट पुढे रेटायची याचा बऱ्यापैकी विचार केलेला दिसतो. सुबोध भावे आणि मानसी नाईक या दोघांच्याच चित्रपटात भूमिका आहेत. या दोघांवर चित्रीत झालेलं अगदी काही सेकंदांचं गाणं सोडलं तर चित्रपट बऱ्यापैकी एकाच जागी घडतो.

दोघांमध्ये हळूहळू सुरू होणारा संवादच चित्रपटाची कथा पुढे नेतो, त्यामुळे नाही म्हटलं तरी चित्रपट शब्दबंबाळ आहे. त्यातल्या त्यात विधीलिखित, नियती असे जड शब्दही तुमच्यापर्यंत कधीमधी पोहोचतात. पण, त्याचाही फार मारा केलेला नाही. अशा पद्धतीचा प्रयोग मराठीत तरी फारसा पाहायला मिळत नाही. मानसी नाईकला पहिल्यांदाच आयटम साँग सोडून गंभीर भूमिकेत पाहण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. आई-वडिलांच्या भांडणामुळे अगदी लहानपणी मनावर उठलेला ओरखडा आयुष्यभर मनात दाबून ठेवलेला माणूस, त्याचं हळूहळू उलगडत जाणं, समोर आलेल्या परिस्थितीचा विचार करत त्यानुसार व्यक्त होत जाणं, एका क्षणी फुटलेला बांध या सगळ्या भावछटा सुबोध भावे यांनी खूप सहजसुंदर पद्धतीने रंगवल्या आहेत. त्याला मानसी नाईकनेही योग्य साथ दिली असल्याने या दोघांमधलं संवादातून उलगडत जाणारं भावनाट्य नीरस वाटत नाही. एका सकारात्मक दिशेने घेऊन जाणारी कथा आणि अपेक्षित साच्यात अडकणार म्हणताना कथेला मिळणारं वळण, अकृत्रिम मांडणी या सगळ्यामुळे ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट अगदीच निराश करत नाही.

सकाळ तर होऊ द्या

दिग्दर्शक – आलोक जैन

कलाकार – सुबोध भावे, मानसी नाईक