लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उपहारगृहात प्रशासनाने पुस्तक विक्रीसाठी दालन सुरू केले आहे. प्रकाशकांना सशुल्क जागा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत डिंपल पब्लिकेशनला येथे जागा देण्यात आली आहे.
माहिती तंत्रज्ञान युगामध्ये मोबाइलच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुस्तक प्रदर्शन किंवा पुस्तकांच्या दुकानांकडे फारच मोजक्या लोकांचेच पाय वळतात. त्यामुळे लोकांपर्यंत पुस्तके पोहोचावीत यासाठी महानगरपालिकेने प्रकाशकांना जागा व सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत आता महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृहात डिंपल पब्लिकेशन या संस्थेला जागा देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक परिसरातील महानगरपालिकेच्या उपहारगृहात रोज महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी, नागरिक यांची वर्दळ असते. अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी या दालनाचे सोमवारी उद्घाटन केले. यावेळी उपायुक्त किशोर गांधी, डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-नागपूरमधील सातशे घरांसाठी डिसेंबरमध्ये सोडत
महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रकाशकांनी प्रतिसाद दिल्यानंतर आता हळूहळू ठिकठिकाणी पुस्तक विक्री दालन सुरू होऊ लागले आहे. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मॅजेस्टिक प्रकाशनचे, तर विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाच्या परिसरात ज्योत्सना प्रकाशनचे पुस्तक विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. चेंबूर येथील महानगरपालिकेच्या जनरल अरुणकुमार वैद्य तरण तलावाच्या परिसरात मनोविकास प्रकाशन या संस्थेला जागा देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या या उपक्रमाला मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या प्रकाशकांनी प्रतिसाद दिला आहे. या प्रकाशकांना अन्य प्रकाशकांची पुस्तकेही विक्री दालनात ठेवता येणार आहे.
या केंद्रांवर शैक्षणिक पुस्तके विक्रीस ठेवता येणार नाहीत, अशी अट घालण्यात आली आहे. मराठी साहित्यातील पुस्तकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू इथे विकता येणार नाहीत, आक्षेपार्ह पुस्तकेही विकता येणार नाहीत, अशीही अट घालण्यात आली आहे.
आणखी वाचा-मुंबई: ‘मेट्रो ७ अ’च्या भुयारीकरणाला सुरुवात
वाचकांना १५ टक्के सवलतीत पुस्तके
या उपक्रमासाठी प्रकाशकांना जागा, पाणी, वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रकाशकांना माफक अटी घालण्यात आल्या आहेत, अशी माहिती समन्वयक संदीप वैशंपायन यांनी दिली. या जागेसाठी सहा हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. तसेच वाचकांना पुस्तके १५ टक्के सवलतीत द्यावी अशीही अट घालण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमातून वाचकांचाही फायदा होणार आहे.