मुंबई : कांदिवलीतील २७ वर्षीय तरूणाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडे एक लाख रुपयांची खंडणी मागणीतल्याच्या आरोपाखाली समता नगर पोलिसांनी रविवारी दोघांना अटक केली. आरोपींच्या तावडीतून तरूणाची सुखरूप सुटका केली. आरोपींनी त्याला डांबून ठेऊन मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी इतर सात आरोपींचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

कांदिवली पूर्व येथील पोयसर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरूणाचे अपहरण करण्यात आले होते. या तरूणाने एका मुलीची छेडछाड केली, त्यामुळे आपण त्याचे अपहरण केल्याचा दावा आरोपींनी केला आहे. समता नगर पोलसांनी याप्रकरणी आदित्य दरेकर(२४) व शब्बीर अब्दुल रेहमान खाल(२३) यांंना अटक केली आहे. त्याच्याविरोधात खंडणी, डांबून ठेवणे, मारहाण करणे, धमकावणे अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अपहरण करण्यात आलेल्या तरूणाच्या पत्नीच्या तक्रारीवरून समता नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, शुक्रवारी बिहार टेकडी येथून आरोपींनी २७ वर्षीय तरूणाचे अपहण केले. त्यानंतर तरुणाच्या पत्नीला दूरध्वनी केला. त्यावेळी आरोपींनी तुझ्या पतीने एका मुलीची छेड काढली आहे. त्यामुळे त्याला माझ्या ताब्यात ठेवले आहे. त्याचा मृतदेह पहायचा नसेल, तर एक लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी आरोपींनी केली. तक्रारदार महिलेलाही शिवीगाळ केली.

या प्रकारामुळे महिला घाबरली असता तिने समता नगर पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पथक कांदिवली पोयसर परिसरात पाठवले. या पथकाने तक्रारदार यांच्या पतीची सुटका केली. यावेळी दरेकर व खाल यांना अटक करण्यात आली. आरोपींनी तक्रारदार यांच्या पतीला मारहाण केली. त्यामुळे पोलिसांनी अपहरण करण्यात आलेल्या २७ वर्षीय तरूणाची वैद्यकीय तपासणी केली. त्याला कोणत्याही गंभीर जखमा नसल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. सात ते आठ जणांनी मिळून या तरूणाचे अपहरण केल्याचे त्याने सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलीस इतर आरोपींचा शोघ घेतत आहेत. रविवारी याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ते मालाड व कांदिवली परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नाही. उर्वरीत आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपहरण करण्यात आलेल्या तरूणाला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे.