मोबाइलच्या बाजारामध्ये भारतीय कंपन्यांचा भाव वधारला असून सॅमसंग आणि नोकिया सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसना मागे टाकत या कंपन्यांनी ग्राहकांची पसंती मिळवली आहे. स्वस्त आणि मस्त फोन ही भारतीयांची मानसिकता लक्षात घेऊन बाजारात उतरलेल्या भारतीय कंपन्या स्मार्टफोनच्या बाजारातही मुसंडी मारू लागले आहेत.
एप्रिल ते जून या कालावधीत संपलेल्या सुरू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत फिचरफोन आणि स्मार्टफोन हे दोन्ही विभाग मिळून मोजल्या जाणाऱ्या मोबाइल फोनच्या बाजारात सॅमसंगची विक्री जागतिक स्तरावर सात टक्क्यांनी घसरली असून भारतातही हाच परिणाम दिसून येत आहे. पहिल्या तिमाहितील देशातील एकूण मोबाइलफोन विक्रीमध्ये मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने बाजी मारली असून त्यांचा बाजार हिस्सा १६.६ टक्के इतका नोंदविला गेला आहे. तर सॅमसंगचा बाजार हिस्सा १४.४ टक्के इतका नोंदविला गेला आहे. याचबरोबर नुकतीच मायक्रोसॉफ्टमध्ये विलीन झालेल्या नोकिया या कंपनीनेही आपला हिस्सा वधारत १०.९ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. देशी कंपनी कार्बननेही मुसंडी मारत बाजार हिस्सा ९.५ टक्क्यांपर्यंत नेणे शक्य केले आहे. भारतीय बाजारपेठ ही देशी तसेच विदेशी कंपन्यांना आकर्षति करत असतेच. इतके वष्रे विदेशी कंपन्यांचा प्रभाव असलेल्या या मार्केटमध्ये प्रथमच भारतीय कंपन्यांनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. काऊंटरपॉइंट रिसर्चने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. मार्च महिन्यापर्यंत मोबाइल बाजारात सॅमसंगचा हिस्सा १६.३ टक्के होता तर मायक्रोमॅक्सचा हिस्सा १३ टक्के होता. सुरू आíथक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत देशी कंपन्यांनी ही मुसंडी मारत विदेशी कंपन्यांना चांगलाच धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. सॅमसंगला दुसऱ्या स्थानावरून हटविणे इतक्यात शक्य नसले तरी तिसऱ्या स्थानावर येण्यासाठी भारतीय कंपन्या उत्सुक आहेत. यामुळे तिसऱ्या स्थानाची लढत अटीतटीची होत असून यामध्ये नोकियाला टक्कर देण्यासाठी कार्बन आणि सेलकॉन सज्ज होत आहेत. तर अॅपल, सोनी या परदेशी कंपन्यांचीही लढत सुरू आहे.
जागतिक स्पध्रेत सॅमसंग पिछाडीवर
जागतिक स्पध्रेतही सॅमसंगचा बाजार हिस्सा ३२.६ टक्क्यांवरून २५.२ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. या खालोखाल अॅपलने वर्णी लावली असून त्यांना जागतिक बाजार हिस्सा ११.९ टक्के इतका आहे. हुवेई या कंपनीने तिसऱ्या स्थानावार येत बाजार हिस्सा ६.८ टक्के इतका नोंदिवला आहे. जागतिक स्पध्रेत भारतीय ब्रँड नसले तरी ते पुढील आíथक वर्षांमध्ये पहिल्या पाच मध्ये येतील असा विश्वास बाजार तज्ज्ञांना वाटत आहे.
स्मार्टफोनमध्ये सॅमसंग अव्वल
स्मार्टफोनच्या बाजारात मात्र अद्याप सॅमसंग आघाडीवर असली तरी त्यांच्या विक्रीवर आधीच्या तुलनेत परिणाम झाल्याचे स्पष्ट आहे. एप्रिल ते जून या कालावधीत सॅमसंगचा भारतीय स्मार्टफोन बाजारात २५.३ टक्के हिस्सा होता तर त्या खालोखाल मायक्रोमॅक्सने १९.१ टक्के हिस्सा नोंदिवला आहे. कार्बन या कंपनीने ५.९ टक्के तर मोटोरोला या कंपनीने ४.३ आणि नोकियाने ४ टक्के हिस्सा नोंदविला आहे. नोकिया ही कंपनी मोबाइल बाजारात देशात तिसऱ्या क्रमांकावर असली तरी स्मार्टफोनच्या बाजारात देशी कंपन्यांपेक्षा मागे आहे.