मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एका गटाला लाभ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने महिला बचत गटांना शिवणयंत्र, घरघंटीऐवजी सॅनिटरी पॅड यंत्र, खाद्यपदार्थ व्यवसाय यंत्र सामग्री संच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सॅनिटरी पॅड बनवण्याचे यंत्र, खाद्यपदार्थाच्या व्यवसायाकरिता यंत्रसामग्री संच तसेच शिवणकाम व्यवसायासाठी यंत्रसामग्री संच पात्र महिला बचत गटांच्या संस्थांना देण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागातील एकच संस्था यासाठी पात्र ठरणार असून त्यांना या संचाऐवजी त्यांच्या बँक खात्यात यासाठीची रक्कम जमा केली जाणार आहे.

सॅनिटरी पॅड बनण्याच्या यंत्राची प्रत्येकी किंमत २ लाख ८३ हजार २०० रुपये असून २२७ प्रभागांसाठी ६ कोटी १० लाख ७२ हजार ८० रुपये यासाठी खर्च होणार आहे. त्यातील ९५ टक्के रक्कम बचत गटांना दिली जाणार आहे. तर खाद्यपदार्थ व्यवसायासाठी देण्यात येणारा संच (फ्रिज, मायक्रोओव्हन, मिक्सर, इंडक्शन कुकर ३ व ५ लिटर) यासाठी प्रत्येकी ४८ हजार २४० रुपये खर्च येणार असून यासाठी २२७ प्रभागांमध्ये १ कोटी ०४ लाख २ हजार ९५६ रुपये एवढी रक्कम बचत गटांसाठी खर्च केली जाणार आहे. तर शिवणकाम व्यवसायासाठी संच (शिवणयंत्र ३ व इतर आवश्यक साहित्य बिडिंग मशीन १ नग) यासाठी प्रत्येकी ३५ हजार ८३० रुपये खर्च केले जाणार असून २२७ प्रभागांमधील बचत गटांच्या खात्यात ७७ लाख २६ हजार ८५३ रुपये जमा केले जाणार आहेत. यंत्र संचाच्या एकूण किमतीच्या ९५ टक्के एवढी रक्कम थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून बचत बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती नियोजन विभागाच्या साहायक आयुक्त हसनाळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकूण ७ कोटी ९२ लाख १ हजार ८८९ रुपये एवढय़ा निधीची तरतूद महापालिकेच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanitary paddies food appliances for saving groups
First published on: 29-11-2018 at 03:00 IST